Press "Enter" to skip to content

योगीराज चैतन्यमूर्ती श्री संत राममारुती महाराज

जन्म – भाद्रपद शु. ९ शके १७७८ – दि. ८ सप्टेंबर १८५६

समाधी -भाद्रपद शु.शके १८४० दि. २८ सप्टेंबर १९१८

     श्री राम उपासनेची थोर परम्परा पुढे नेणारे व साक्षात श्री राममारुतीचा अवतार म्हणून ओळखले जाणारे थोर संत श्री राममारुती महाराजांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पेण येथे  ८ सप्टेंबर १८५६ भाद्रपद शुध्द नवमी शके १७७८ रोजी चांद्रसेनिय कायस्थ प्रभु कुटुम्बात देशपांडे घराण्यात झाला .

     महाराजांच्या पणजोबांचे नांव देवजी उर्फ देवराम ,आजोबांनचे नांव सीताराम आणि वडीलांचे नांव राजाराम असे होते .म्हणजे त्यांच्या पणजोबा ,आजोबा ,आणि वडील यांच्या नावातच रामनाम दडलेले होते .

     महाराजांच्या मातोश्री सीताबाई या पहील्यापासूनच श्रीराम उपासक होत्या .हातात काम व मुखात रामनाम हेच त्यांचे सहज वागणे होते .महाराजांच्या वेळेस त्यांना दिवस गेले असता भजनात व रामनामात त्यांची गोडी अधिकच वाढली व कधी कधी. तर भजन चालू असताना उंच उंच उड्डाण करावे असेही त्यांना वाटे .पण त्यांच्या पोटी रामभक्त महारुद्र हनुमानाचे अवतार असणारे बालक जन्म घेणार आहे याची पुसटशी कल्पनाही कोणालाही नव्हती .त्यांचा जन्म मूळ नक्षत्रात झाल्यामुळे त्यांची शांती करण्यात आली .त्यांचे भिवंडी येथे सीताबाइंच्या माहेरी बारसे करण्यात येऊन नांव शंकर असे ठेवण्यात आले .शंकर म्हणजे !!शं करोती इति शंकर : !

शं म्हणजे कल्याण .जो सर्वांचे कल्याण करतो तो शंकर .

महाराज ७-८ वर्षाचे असतांना गंगाधर महाराज टाकळीकर यांनी त्यांचे नांव रामजी ठेवले .!!रामजी !! म्हणजे चैतन्यरूप .कारण राम म्हणजे चैतन्य .महाराजांना या काळात त्यांच्या चैतन्य स्वरूपाची जाणीव होऊ लागली होती .त्यानंतर सद्गुरू क्रूपेने १०-१२ वर्षे साधना झाल्यावर ती परिपक्व होऊन स्वताचे मूळ चैतन्यरूप जिकडे तिकडे दिसू लागले .थोडक्यात रामरूपी चैतन्य ओळखण्याची मारुतीरुप शक्ती व बुद्धी त्यांना प्राप्त झाली .म्हणून सद्गुरू बालमुकुंद स्वामी महाराज यांनी त्यांचे नांव राममारुती असे ठेवले .

राम हे नाम आहे व मारूती हा नामी ,ची एकरूपता म्हणजे अखंड अद्विताअवस्था !
ही स्थिती प्राप्त झाली म्हणूनही त्यांना राममारुती असे नांव सद्गुरूंनी दिले असावे .या नावाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे देव व भक्त या दोघांना एकत्र गुम्फणारे असे नांव आहे .

                                        *बालपण*

महाराजाना एक भाऊ मोठ्या दोन बहिणी होत्या .वयाच्या ३,४ वर्षापर्यंत महाराजांचे बालपण इतर मुलांप्रमाणे खेळण्यात ,बागड्न्यात गेले .मात्र ५-६ वर्षानंतर त्यांच्या व्रुत्तीतील फरक दिसू लागला .मातोश्रीबरोबर देव दर्शनाला ,कीर्तनाला जाणे कधी कधी तर शंकर मंदिरात किंवा राम मंदिरात एकटेच जाऊन बसणे .गरीब भुकेला दाराशी आल्यास स्वताच्या पुढ्यतिल वाढलेले ताट त्यास देवून टाकणे ,प्रसंगी अंगावरचे कपड़े काढून देणे असे होऊ लागले .थोडक्यात कमी वयात विरक्तपणा वाढून भगवंताच्या सहवासाची ओढ वाढू लागली .त्यांना शाळेत घातले परंतु अंतरी परमेश्वराची ओढ असल्यामुळे शालेय शिक्षणात त्यांना रस वाटेना .मंदिरात तासंतास बसत असल्याने शाळेत नियमित जाणे होतच नसे .एकदा शिक्षकांनी महाराजाचे दप्तर तपासले तेव्हा त्यात -तुकारामाची गाथा आढळून आली .तेव्हा शिक्षक महाराजांच्या वडिलांना म्हणाले की हा मुलगा पूर्व जन्मी पूर्ण शिक्षण झालेला अधिकारी पुरुष असावा याला शिकवण्यास आम्ही पात्र नाही .त्यामुळे यानंतर शाळेचा विषय बंद झाला .

यानंतर महाराज भिवंडी येथील श्री भिमेश्वर शंकर मंदिर , राम मंदिर ,श्री मारुती मंदिर ,रामेश्वराचे मंदीर या देवळात जास्तीत जास्त वास्तव्य करु लागले .महाराज देवालयात पोत्यात पाय घालून पिंडीवर डोकेठेऊन तासन तास पालथे पडलेले असत .ते जणू शंकराला त्याचा आवडता राम जप ऐकवत आहेत असे वाटे .

                                *श्री सगुरु कृपा*

महाराजांची साधना सुरूच होती.त्यांना गुरूचा ध्यास लागला.त्यांचे मामा आजोबा माधव खारकर त्यांना सद्गुरू बालमुकुंद स्वामी यांच्याकडे घेऊन गेले व त्यांना आठवण करून दिली की हा मुलगा सहा महिन्यांचा असताना आम्ही याला आपल्या चरणावर घातला होता तेव्हा आपण म्हणाला होतात की " हा मुलगा तुमचा नसून माझा आहे. माझा प्रसाद म्हणून मी आपल्या येथेच वाढू द्या योग्यकाळी मी याला घेऊन जाईन." स्वामींनी त्यांना स्विकारले व गुरुमंत्राची दीक्षा दिली. तेव्हापासून महाराज कायमचे गुरूगृही राहू लागले. महाराजांना गुरूंचा अनेक वर्ष सहवास लाभला.सन १८८३ साली स्वामींनी राममारुती महाराजांच्या मांडीवर मस्तक ठेऊन वैकुंठगमन केले.

*व्यक्तिमत्व*

राममारुती महाराजांची शरीरकाठी उंच होती. बांधा पिळदार होता , कांती सुवर्णासारखी तेजस्वी होती. हात पाय मात्र अशक्त दिसत असत.त्यामुळे त्यांना लहानपणी पांगळे समजले जात असे. छाती रुंद होती , महाराजांचा चेहरा , दृष्टी , नाकाची व ठेवण तसेच हाताची बोटे वळवण्याची पध्दत अशी होती की पाहणाऱ्यास प्रत्यक्ष मारुतीच पहात आहोत असे वाटे. महाराज तीर्थाटणास जाईपर्यंत त्यांच्या अंगावर जरीकाठी उपरणे , रुमाल , गळ्यात सोन्याची कंठी , हातात सलकडे , बोटात अंगठ्या , कानात टपोरी भिकबाळी व पायात जोडा असा त्यांचा पोशाख असे.तीर्थाटणाहून आल्यावर मात्र त्यांच्या पोशाखात बदल झाला. कांस मारलेले शुभ्र धोतर , अंगावर फक्त उपरणे , डोक्याला पांढरा जरीकाठी सोगा सोडलेला रुमाल , हातात मजबूत काठी , पायात वहाणा , डाव्या मनगटात तांब्याचे कडे , बोटात सल्ले आणि कानात लहानपणापासून वापरत असलेली भिकबाळी असा साधा पोशाख करीत असत. पायातील दोन्ही अंगठ्यात तांब्याची वळी ठेवीत. महाराज आपणहून कोणाजवळ काही मागत नसत. गुरुपुजन म्हणून शाली व वस्त्रे तसेच दक्षिणा दिल्यास जरूरीपुरते पैसे व वस्त्रे घेत बाकी सर्व गरजूंना वाटत असत. स्वतः संग्रही काहीही ठेवीत नसत. अशा प्रकारे वैराग्यशील त्यांची राहणी होती.

*महाराजांचे वैराग्य व ब्रम्हचर्य*

महाराजांच्या ईश्वरनाम भाषेत स्त्रीवाचक शब्दही नसे. स्त्रीसाठी ते ईश्वरनाम भाषेत " जय जयराम " हे नाम उच्चारीत असत. स्त्रिया नमस्कार करण्यास आल्यास त्यांना लांबून नमस्कार करण्यास सांगत. आपली दृष्टीही त्यांच्याकडे जाऊ देत नसत. उलट तेच त्यांना नमस्कार करीत. महाराजांचे वैराग्य व ब्रम्हचर्य आतिश तीव्र होते.त्यांनी आपले हे व्रत तलवारीच्या धारेप्रमाणे प्रखर ठेवले होते.

*महाराजांची शिक्षणातून राष्ट्र उन्नतीची कळकळ*

श्रीराममारुती महाराजांना देशाची व समाजाची अवनती थांबवण्यासाठी तरुणपिढी सुशिक्षित , सुदृढ , स्वावलंबी व सुसंस्कारी असावी असे वाटत होते.त्यासाठी असे शिक्षण देणाऱ्या संस्था समाजात निर्माण व्हाव्यात व त्यामार्फत समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थांना असे शिक्षण मिळावे अशी त्यांची इच्छा होती.१९१४ साली श्री संत नाना महाराज श्रीगोंदेकर यांची व महाराजांची भेट श्री माधवराव नागले यांच्या घरी झाली.नाना महाराज हे मुरुडचे म्हणजे पूर्वीच्या पूर्वीच्या कुलाबा व सध्याच्या रायगड जिल्ह्याचे दोघेही सी.के.पी.समाजातील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोघेही एकाच गुरुपरंपरेतील असल्याने दोघांच्यात अनेक विषयावर चर्चा झाली.राममारुती महाराजांनी नाना महाराजांना शिक्षण संस्थाच्या संदर्भातील आपली योजना सांगितली.सुरवातीला सी.के.पी.समाजात जागृती करावी असे ठरले.नाना महाराजांनी राममारुती महाराजांच्या प्रेरणेने १९३१ साली अविश्रांत परिश्रम , सत्यनिष्ठा व आंतरिक तळमळ यांच्या बळावर मुंबईत 'कृष्णानंद प्रासादिक चां.का.प्रभु शिक्षणोतेजक परस्पर सहाय्यक शिक्षण संस्था ' व स्त्रियांसाठी 'मातृवात्सल्य सेवा मंडळ ' या दोन संस्था व विठ्ठलनगर येथे " कृष्णानंद राममारुती विद्याश्रम " अशा संस्था स्थापन केल्या व पुढे त्या सर्व समाजासाठी खुल्या केल्या.अशा तर्हेने राममारुती महाराजांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न झाला परंतु १९४२ नंतर शैक्षणिक संस्थेचे कार्य बंद झाले.



*श्री राममारुती महाराजांचा संत समागम*



१९१० साली महाराजांनी शिर्डी येथे साईबाबांची भेट घेतली.भेटीत दोघांनाही खुप आनंद झाला.साईबाबांनी महाराजांना पोटाशी घट्ट कवटाळून धरले.महाराजही आनंदाने उड्या मारू लागले व बाबांचे लाड करू लागले.दोघेही गहिवरले गेले.बाबांच्या आग्रहाखातर महाराज अनेक दिवस शिर्डीत राहिले. निघण्यापुर्वी साईबाबांनी महाराजांना जवळ बोलावून त्यांच्या कानात काही गुप्त संदेश दिला.

राममारुती महाराजांना श्री संत गजानन महाराज (नाशिक ) , श्री संत गजानन महाराज (शेगाव ) , श्री संत केशवदत्त महाराज सोनगिरीकर , श्री संत शांतारामभाऊ जयवंत (भिवंडी) इत्यादी संतांचा सहवास लाभला.

*श्री राममारुती महाराजांची ईश्वरनाम भाषा*

राममारुती महाराजांचे गुरूबंधु एका बैठकीत कोणत्यातरी मोठ्या व महत्वाच्या सिध्दांतावर चर्चा करत होते.एक मुद्दा समोरच्या विद्वानांना पटवून देत होते.परंतु समोरच्याना तो पटत नव्हता. महाराज तेथे होते.त्यांनी तो पटवून दिला.सर्व विद्वान खुश झाले.त्यांनी महाराजांचा गौरव केला. परंतु त्यांचा गुरुबंधु नाराज झाला.तो म्हणाला मी तो मुद्दा वेगळ्या पध्दतीने समजाऊन सांगितला असता परंतु तुमच्यामुळे मला कमीपणा आला.हे ऐकून महाराजांचे मन उदास झाले.त्यांनी गुरूबंधूच्या पायावर डोके ठेवले व क्षमा मागून " अशा वादासाठी यापुढे मी भाषा वापरणार नाही " त्या क्षणापासून श्री राममारुती महाराजांनी प्राकृत भाषेचा त्याग केला व स्वतः बनवलेल्या "ईश्वरनाम " भाषेचा शेवटपर्यंत जवळ जवळ पंचवीस वर्ष वापर केला.या ईश्वरनाम भाषेत ईश्वराची फक्त बावीस नावे वापरली.

श्रीराम , जयराम , जय जय राम , रामचंद्र , रघुवीर , रघुपती ,शिवशंकर , भीमाशंकर , हर हर महादेव , शिव - शिव , विठ्ठल , विठोबा , पांडूरंग , गोविंद -१ , गोपाळ -२ , गणपती , गोपाळकृष्ण , हरी , हरिनारायण , दत्तात्रय , मारुती , बलभीम या नामांचा वापर करून ते भाषा वापरत असत. वाराचा उल्लेखसुध्दा ते पुढीलप्रमाणे करत असत. सोमवार - शिवशंकर , मंगळवार - जय जय राम , बुधवार - विठोबा , गुरुवार -दत्तात्रय , शुक्रवार - शिव शिव जय जय राम , शनिवार - मारुती , रविवार - नारायण.

महाराजांनी ही भाषा विवक्षित रीतीने बसविली होती व ते इतके जलद बोलत की जणू काय आपल्या व्यवहारातील ही भाषा आहे़ असा भास होई.समोरच्या सामन्यांपासून विद्वानांना ही भाषा सहजपणे समजतअसे. इतकेच नाही तर ही कर्णमधूर भाषा अशीच त्यांच्या तोंडून ऐकत रहावी अशी प्रबळ इच्छा ऐकणाऱ्या सर्वांना वाटत असे. विशिष्ट व्यक्तींचे नांव व क्वचित प्रसंगी न समजलेलं वाक्य दगडी रुळाने पाटीवर लिहून दाखवित. या त्यांच्या ईश्वरनाम भाषेत महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या शाळकरी मुलांना अवघड अशी गणिते सोडवून देत व त्यांच्या रिती सुध्दा समजाऊन सांगत. महाराजांचे इंग्रजी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते.ही भाषा त्यांनी अल्पावधीत तयार केली. त्यांच्या निधनापर्यंत जवळ जवळ पंचवीस वर्ष एकट्याने वापरली.त्यांच्या निधनानंतर ही भाषा नष्ट झाली.अशी भाषा जगातील एकमेव ठरली.



*श्री संत राममारुती महाराजांचे निर्वाण*

महाराजांनी निर्वाणापुर्वी मुंबई ,ठाणे , कल्याण इत्यादी ठिकाणच्या भक्तांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली.एके दिवशी सकाळी आपले शिष्य श्री. शंकरराव गडकरी यांच्याकडे गेले.तेथे त्यांच्या सहा महिन्याच्या पुतण्यास मांडीवर घेऊन भू :भू :कार करून उंच उंच उड्या मारल्या व त्या बालकाच्या सर्वांगावर हात फिरवून त्यास मातेकडे दिले.हे भाग्यवान बालक म्हणजेच पोथीचे लेखक श्री अनंत यशवंत तथा बाबुराव गडकरी (संस्थेचे अध्यक्ष श्री शिरीष अनंत गडकरी यांचे वडील ) होत.

सर्व भक्तांच्या भेटी झाल्यानंतर ते कल्याण येथील दळवीवाड्यात आले.त्यांना खुप ताप भरला.सर्व भक्त चिंतातूर झाले महाराजांनी सर्व भक्तांना दूर जाण्यास सांगितले आणि पायापासून डोक्यापर्यंत उपरणे ओढून घेऊन जोरजोरात नामस्मरण करण्यास सुरवात केली पहाटे सव्वा पांच वाजता ब्राम्ह मुहूर्तावर महाराज प्रभू श्रीरामचंद्र स्वरूपात विलीन झाले व आपला तेजस्वी अवतार संपविला.ती तारीखहोती २८ सप्टेंबर १९१८ वद्य नवमी शके १८४०. त्यावेळेस श्री केशवराव दळवी एकटेच होते.त्यांनी सर्व भक्तांना ही दुःखद वार्ता सांगितली.हजारो भक्तांसह रात्री ८ वाजता दळवी वाड्यातून अंत्ययात्रा निघाली ती रात्री एक वाजता कल्याण येथील लालचौकीजवळ पोहोचली.तेथे त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आला.ज्या ठिकाणी हा अग्निसंस्कार सोहळा झाला त्या जागेवर अस्थिकलश ठेऊन समाधी बांधण्यात आली.

*भाविकांना विनम्र आवाहन*

कल्याण येथील लालचौकी जवळ श्री संत राममारुती महाराजांचे समाधी मंदिर असून ते सकाळी ८ ते १ व सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत दर्शनास उघडे असते.कल्याण मधील त्यांची ही संजीवन समाधी हे समस्त भक्तांचे श्रध्दा व विश्वासाचे स्थान असून भक्तांच्या नवसाला व प्रार्थनेला प्रतिसाद देतात अशी भक्तांची श्रध्दा आहे़. संस्थेतर्फे विविध धार्मिक तसेच सामाजिक बांधिलकी असलेले उपक्रम राबवले जातात.

प.पू.स्व.अनंत यशवंत तथा बाबुराव गडकरी लिखित "श्री संत राममारुती महाराजांची पोथी " व "श्री राममारुती स्तवन माहात्म्य " यांचे दैनंदिन पठण जरूर करावे. महाराजांच्या बद्दल अधिक माहिती हवी असल्यास डॉ.सौ.अशाताई गडकरी यांनी लिहिलेले "योगीराज चैतन्यमूर्ती श्री राममारुती महाराज" हे रंगीत फोटोसह २०६ पानी चरित्र वाचावे. हे वाचल्यानंतर महाराजांची महती व त्यांच्या कार्याची माहिती मिळते व सहज मनात विचार येतो.

"दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती "

८ सप्टेंबर २०३१ रोजी महाराजांची १७५ वी जयंती आहे़.महाराजांची माहिती व महती देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल असा आपण प्रयत्नं करू.

दिलीप प्रभाकर गडकरी, कर्जत रायगड.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.