


पनवेल : प्रतिनिधी
पनवेल शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित करण्याच्या उद्देशाने वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात पनवेल शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने संयुक्त विशेष रिक्षा कारवाई मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत तब्बल 165 रिक्षांवर कारवाई करून ₹1,44,350 दंड आकारण्यात आला.
आज दिनांक 07/09/2026 रोजी सकाळी 09.00 ते 11.30 वाजेपर्यंत पोलीस निरीक्षक श्री. सुभाष पुजारी, पनवेल शहर वाहतूक शाखा तसेच श्री. अनिल गेळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त विशेष मोहीम राबविण्यात आली.
ही कारवाई पनवेल रेल्वे स्थानक व उरण नाका या प्रमुख ठिकाणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान रिक्षामध्ये फ्रंट सीट बसविणे, गणवेश परिधान न करणे, मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणे तसेच इतर विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली.
रिक्षाचालकांनी प्रवाशांची सुरक्षितता व सुविधा लक्षात घेऊन वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत, गणवेश परिधान करावा आणि प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारावे, असे आवाहन पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.


Be First to Comment