
पनवेल, दि.७ (वार्ताहर) : माँसाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका प्रगती कैलास पाटील यांच्या पुढाकाराने तळोजा येथे आयुष्मान कार्ड व आभा कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या या शिबिराला तळोजावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सहज उपलब्ध व्हावा, तसेच आरोग्यविषयक डिजिटल नोंदी तयार करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात नागरिकांना आयुष्मान कार्ड तसेच आभा कार्डबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आणि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आली.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य कुटुंबीयांनी शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. आरोग्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळली.
‘नागरिकांची सेवा हीच खरी सामाजिक बांधिलकी’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि संबंधित सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल प्रगती कैलास पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.


Be First to Comment