
“आई ! मला जन्म घेऊ दे” सह प्रभावी साहित्यनिर्मितीची दखल;४५ भारतीय भाषांमध्ये कवितेचे अनुवाद
जळगाव (आनंद पवार)
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक तथा साहित्यिक प्रा.वा. ना.आंधळे यांच्या प्रदीर्घ साहित्यिक वाटचालीचा पुन्हा एकदा गौरव झाला आहे.त्र्यंबकेश्वर,जि.नाशिक येथे दि.३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या चौथ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.वा. ना.आंधळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या केंद्रीय कार्यकारिणीने यासंदर्भातील निमंत्रण पत्र नुकतेच त्यांना सुपूर्द केले.गेल्या चार दशकांपासून अव्याहतपणे काव्यलेखनाची साधना करणाऱ्या प्रा. आंधळे यांनी आपल्या संवेदनशील, सामाजिक भान असलेल्या आणि वास्तवाला भिडणाऱ्या लेखणीतून मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.यापूर्वी त्यांनी तब्बल पाच वेळा राज्यस्तरीय साहित्य संमेलनांच्या कवी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.वृत्तपत्रांपासून वाङ्मयीन नियतकालिके आणि दिवाळी अंकांपर्यंत सातत्याने काव्यलेखन करणाऱ्या प्रा.आंधळे यांच्या साहित्याची दखल केवळ साहित्यिक वर्तुळापुरती मर्यादित राहिलेली नाही.महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरातमधील विद्यापीठे तसेच शालेय अभ्यास मंडळांनी त्यांच्या साहित्याचा शालेय पाठ्यपुस्तकांपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत समावेश करून त्यांच्या सृजनाचा गौरव केला आहे.

आई! मला जन्म घेऊ दे’ कवितेचा देशभर ठसा
प्रा.आंधळे यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील आई! मला जन्म घेऊ दे’ ही कविता विशेष मैलाचा दगड ठरली आहे.सामाजिक संवेदना जागविणाऱ्या या कवितेचे इंग्रजीसह तब्बल ४५ भारतीय भाषांमध्ये उत्स्फूर्त अनुवाद झाले आहेत.सातासमुद्रापार पोहोचलेल्या या कवितेची आकाशवाणी दूरदर्शन,यू-ट्यूब वाहिन्या तसेच विविध वृत्तपत्रांनी दखल घेतली असून,त्यांच्या लेखणीच्या व्यापक प्रभावाची ही जणू पावतीच मानली जाते.याचबरोबर डॉ.म.सु.पगारे लिखित ‘बा तथागता’ या सुमारे अडीचशे पानी मराठी विशाल कवितेचे प्रा.आंधळे यांनी अहिराणी बोलीत केलेले भाषांतर भाषा अभ्यासक आणि समीक्षकांकडून गौरविले गेले आहे.बुद्धतत्त्वज्ञानावर आधारित अहिराणी बोलीतील पहिला अनुवादित काव्यग्रंथ म्हणून या साहित्यकृतीची खान्देशच्या साहित्यविश्वात विशेष नोंद झाली आहे.
प्रा.आंधळे यांच्या कवितेवर पीएच.डी. संशोधनातूनही साहित्याचा गौरव
प्रा.आंधळे यांच्या सृजनशील साहित्यिक वाटचालीची दखल विद्यापीठीय संशोधन क्षेत्रानेही घेतली आहे. त्यांच्या कवितांवर संशोधन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथील दोन संशोधक प्राध्यापकांनी पीएच.डी.पदवी संपादन केली आहे.
सामाजिक बांधिलकी जपत साहित्याच्या माध्यमातून समाजहिताचे विचार जनमानसापर्यंत पोहोचविणाऱ्या प्रा.आंधळे यांनी दूरदर्शन मुंबई आणि दूरदर्शन दिल्ली येथून प्रसारित झालेल्या मराठी व हिंदी समाजहितैषी मालिकांसाठीही शीर्षकगीत लेखन केले आहे.त्यामुळे त्यांच्या लेखणीचा ठसा साहित्याबरोबरच प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातही उमटला आहे.
साहित्यसाधनेला मिळाली मानाची पावती अखिल भारतीय स्तरावर होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या साहित्य संमेलनातील कवी संमेलनाध्यक्षपदाची जबाबदारी प्रा.वा.ना.आंधळे यांच्यावर सोपविण्यात येणे ही त्यांच्या चार दशकांच्या अविरत साहित्यसाधनेची मानाची पावती मानली जात आहे. त्यांच्या या निवडीमुळे साहित्यप्रेमी,कवी,लेखक,समीक्षक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये आनंदाचे वातावरण असून,प्रा.वा.ना.आंधळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Be First to Comment