
रोहा:प्रतिनिधी
रोहा तालुक्यात शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य दहीहंडी स्पर्धा यंदा चांगलीच गाजली. गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ढोल-ताशांचा गजर आणि नागरिकांची मोठी गर्दी यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे लाटणेश्वर-खारी गोविंदा पथकाने मागील वर्षी हुकलेला विजय यंदा मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
दमदार आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना युवा नेते आकाश भैया धोत्रे यांच्या पुढाकाराने आणि महेंद्र दळवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्ष पाटील यांच्या नियोजनातून या भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मागील वर्षी आठ थरांची सलामी देण्यात थोडक्यात अपयशी ठरलेल्या लाटणेश्वर-खारी गोविंदा पथकाने यंदा मात्र दहीहंडी फोडण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी पथकाने जोरदार सराव केला. अखेर जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर खारीच्या गोविंदांनी आठ थरांची सलामी देत प्रथम क्रमांक पटकावला.
खारीच्या गोविंदांनी विजय मिळवताच “खारी गावची पोरं लय हुशार!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मागील वर्षी हुकलेली संधी यंदा विजयात बदलल्याने गोविंदा पथकाच्या सदस्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला.

प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या लाटणेश्वर-खारी गोविंदा पथकाला आकाश भैया धोत्रे यांच्या हस्ते १ लाख २१ हजार रुपयांची रोख रक्कम आणि मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.
या दहीहंडी स्पर्धेसाठी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले, रायगड जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रमोदजी घोसालकर, जिल्हा परिषद सदस्य सुमित काते, जिल्हा परिषद सदस्य उर्वशी उद्देश वाडकर, तालुकाप्रमुख उद्देश वाडकर, शिवसेना नेते अशोकशेठ धोत्रे, संतोष पोटफोडे, पूजा पोटफोडे, शिल्पाताई धोत्रे, सुरेशदादा महाबले, चंद्रकांत जाधव, चंद्रकांत लोखंडे, निलेशजी वारंगे, समीर महाबले, मंगेशशेठ सरफळे, उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, संतोषशेठ खेरटकर, लालताशेठ कुशवाह, उस्मानभाई रोहेकर, शहरप्रमुख मंगेश रावकर, रोहा तालुका युवा सेना प्रमुख रोशन पवार, युवा सेना शहराध्यक्ष राहुल गुरव, अमलकांत मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रोहा तालुक्यात शिवसेनेच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि गोविंदा पथकांचा मोठा सहभाग यामुळे यंदाची दहीहंडी विशेष चर्चेत राहिली.
राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा राजकीय प्रभाव असलेल्या रोहा तालुक्यात शिवसेनेने भव्य दहीहंडीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आयोजनाकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.
मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांचे रोहा तालुक्यावर विशेष लक्ष असल्याने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक मातब्बर नेते शिवसेनेत दाखल होत असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दहीहंडीच्या निमित्ताने रोहा तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून, तटकरे बालेकिल्ल्यात शिवसेनेची दहीहंडी हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.


Be First to Comment