



पनवेल / प्रतिनिधी.
पनवेल मधील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या वतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याला शंभर वर्षांहून अधिक कालखंडाची परंपरा लाभली आहे. शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर आणि शनिवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी कृष्ण जन्म आणि गोकुळाष्टमी निमित्त पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शतकोत्तर वर्षांची परंपरा असणारा पारंपारिक सोहळा अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाला.
यंदाचे सीकेपी समाजाच्या कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचे १०५ वे वर्ष होते. सीकेपी समाज पनवेल यांच्या श्री लक्ष्मीनारायण न्यासाच्या वतीने या पारंपरिक सोहळ्याचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते. शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी गोकुळाचे आगमन होते. गोकुळ म्हणजे श्रीकृष्णाची सुबक मूर्ती. पनवेलच्या कुंभार वाड्यातील नरेश कुंभार यांच्या कुटुंबीयांच्या वतीने श्रीकृष्णाची शाडू मूर्ती घडविण्याची परंपरा आहे.
यंदाचे वर्षी सीकेपी समाजाचे खजिनदार महेश कर्णिक आणि श्वेता कर्णिक या दांपत्याच्या हस्ते गोकुळ प्राणप्रतिष्ठा, पूजन व आरती करण्यात आली. सीकेपी समाजाच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर सभा मंडपामध्ये श्रीकृष्णाचा पाळणा बांधून मध्यरात्री जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी माता भगिनी घरून करून आणलेली विविध मिष्टान्न, पारंपारिक गोड पदार्थ यांचा छप्पन्न भोग म्हणजेच नैवेद्य अर्पण करतात.यंदाचे वर्षी रात्री १०.३० वाजता स्नेहश्री सीकेपी महिला मंडळाच्या वतीने भजनाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीकृष्ण जन्माच्या वेळी माता भगिनींनी पाळणा गीत सादर केले. त्यानंतर आरती संपन्न झाली.
शनिवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी सकाळी समाजातील बाळगोपाळांकरता छोटेखानी हंडीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशभूषेतील बाळ गोपाळांनी या हंडीची मजा लुटली. यावेळी बाळ गोपाळांना चॉकलेट्स आणि चिक्कीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर मानाची समजली जाणारी हंडी बांधली. विविध आस्थानांमध्ये धार्मिक हंड्या फोडण्यासाठी जाणाऱ्या कान्हांना ही हंडी फोडण्याचा मान देण्यात येतो. सायंकाळी पाच वाजता पनवेलच्या श्री बल्लाळेश्वर विसर्जन तलावामध्ये गोकुळाचे पारंपारिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
सायंकाळी विविध मान्यवरांचे उपस्थितीत सीकेपी समाजातील नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. क्रीडा,शिक्षण, कला,संस्कृती,व्यवसाय, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या बांधवांना विशेष गुण गौरव सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर प्रथितयश उद्योगपती सुधीर उर्फ राजाभाऊ गुप्ते, जवाहर इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष स्वप्निल गुप्ते, विश्वस्त श्रीकृष्ण चित्रे, सचिव गिरीश गडकरी, खजिनदार महेश कर्णिक, विश्वस्त राहुल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विजयश्री देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर गौरी राजे यांनी आभार प्रकट केले.
रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सीकेपी समाजाचे पदाधिकारी, विश्वस्त, युवा मंचचे अध्यक्ष तुषार देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली युवा मंचची उत्साही जेन झी टीम, ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
सीकेपी समाजाचे मुखपत्र असणारे कायस्थ स्पंदन या नियतकालिकाच्या जोडपुष्पाचे राजा भाऊ गुप्ते यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी संपादिका मीनल रणदिवे, संपादकीय मंडळ सदस्य संपदा देशपांडे, पत्रकार मंदार दोंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सीकेपी समाजातील साहित्यिकांना दिल्या जाणाऱ्या कै प्रदिप विश्वनाथ गुप्ते साहित्य पारितोषिक – प्रथम वर्षचे वितरण गुणगौरव सोहळ्यात करण्यात आले. कै. प्रदीप गुप्ते यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पारितोषिकासाठी त्यांचे चिरंजीव स्वप्निल गुप्ते यांनी सीकेपी समाज पनवेल व कायस्थ स्पंदन यांना पाठबळ दिलेले आहे. स्वप्निल गुप्ते आणि राजाभाऊ गुप्ते यांच्या शुभहस्ते पारितोषिकप्राप्त साहित्यिकांचा गौरव करण्यात आला.


Be First to Comment