

पेण, ता. ५ (वार्ताहर) : कोकणातील मध्य रेल्वेचे दुसरे स्थानक आणि गणपतीचे माहेरघर म्हणून जग प्रसिद्ध असलेल्या पेण रेल्वे स्थानक येत्या काही दिवसांतच आंतरराष्ट्रीय विमानतळासारखे उभे राहणार असून रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे सदर स्थानकाचा कायापालट होणार आहे.रायगडचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या पेण रेल्वे स्थानकाची अवस्था दयनीय असल्याचे दिसून येत असताना येथे लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा तसेच पेण पनवेल लोकल सेवा सुरू करावी यासह इतरही प्रवाशांच्या समस्या दूर करावे याकरिता पेणकरांनी तसेच प्रवासी संघटनेने अनेकदा आंदोलने करत मागणी केली होती.त्या अनुषंगाने रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी देशाचे पंतप्रधान तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री यांना याबाबतचे निवेदन दिले होते. या निवेदनाच्या पाठपुरावा करत अखेर रोहा आणि पेण रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून त्यामध्ये पेण रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी ६३ कोटी रुपये निधी आणला असून त्याचे काम लवकर सुरू होणार आहे.त्यामुळे या रेल्वे स्टेशनचे सादरीकरण करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दि. ४ रोजी पेण नगरपालिकेच्या सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, सभापती कलवती पाटील, आनंद जाधव, अफ्रीन अखवारे, नगरसेवक वसुधा पाटील, नीलकंठ म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दयानंद भगत, शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर, ॲड. मंगेश नेने, विजय कदम, दिपक गुरव, दिपक सावंत, मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह रेल्वेचे अधिकारी वर्ग तसेच नागरिक मोठ्या उपस्थित होते.यावेळी नव्याने होणाऱ्या अद्यावत रेल्वे स्थानकाचे चित्रफित द्वारे सादरीकरण करण्यात आले असता यामध्ये रस्त्याच्या सुरुवातीपासूनच गणपती मुर्तींची उभारणी करून स्वतंत्र रिक्षा, टू व्हिलर थ्री व्हीलर पार्किंग, फोरव्हीलर पार्किंग आणि स्थानकाच्या आतील सुशोभिकरण, प्लॅटफॉर्मचे नुतनीकरण, तिकीटघर, स्वागतकक्ष, उद्यान यासह संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर अद्ययावत करण्यात येणार असल्याची पूर्ण माहिती संबंधित अधिकारी वर्गाने यावेळी उपस्थितांना दिली.तर लवकरच पेण रेल्वे स्थानकाची प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढण्यात येणार असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येथील सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे संकेत खासदार सुनिल तटकरे यांनी दिले आहे.
आमदार रविशेठ पाटील यांनी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पेणच्या विकासाला गती देण्याची मागणी केली होती त्या दृष्टिकोनातून दिलेला शब्द पाळत पेण शहराच्या रस्ते विकासासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी देण्यात आला त्यामुळे त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी पालिकेच्या नूतनीकरण करण्यात येणाऱ्या सभागृहाला स्व.अजित पवार यांचे नाव देण्याचा ठराव घेतला असल्याची घोषणा खासदार सुनिल तटकरे यांनी सभागृहात केली.


Be First to Comment