
पेण (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी या रेल्वे सेवेचा शुभारंभ आज करण्यात आला असून दुपारच्या दरम्यान पेण स्थानकात आलेल्या या रेल्वे सेवेला पेणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
कोकणातील पेण हे मध्यवर्ती ठिकाण असून प्रवाशांची वाढती संख्या पाहता येथे लांब पल्ल्याच्या जलद रेल्वे गाड्यांसह लोकल सुरू करावी ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी वर्ग करत असताना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होत असताना मुंबई वरून निघालेली सावंतवाडी रेल्वे गाडी दुपारच्या दरम्यान पेण रेल्वे स्थानकात दाखल होताच माझं पेण, प्रवाशी संघटना, जेष्ठ नागरिक, पेण सन्मान समिती आणि महिला प्रवाशी प्रतिनिधी यांनी सदर रेल्वे गाडीला पुष्पहार अर्पण करून सर्वत्र पेढे वाटप करत उत्साहात स्वागत केले.
तर यावेळी प्रवाशांच्या वतीने सुरू असणारी मेमू गाडी शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुरू ठेवावी जेणेकरून येथील प्रवासी वर्गाला जाणे येणे सोयीस्कर होईल अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी सी.आर.म्हात्रे, प्रजेश शिंदे, गजानन पडाळकर, वैशंपायन, घाटे, गौरव कारेकर, नम्रता कारेकर आदिंसह मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्ग उपस्थित होते.


Be First to Comment