
पेण, ता. ३ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील मुंबई- गोवा महामार्ग लगत असणाऱ्या जिते खारपाडा हद्दीतून अनेक क्रेशर प्लांटच्या अनाधिकृत ओव्हरलोड वाहतूकीमुळे महामार्गावर होत असलेले चिखल आणि डंपर मधून पडलेली खडी यामुळे मोटरसायस्वारांचे येथे वारंवार अपघात होत आहेत तर काही दिवसापूर्वीच एका तरुणाचे अपघातात मृत्यू झाले त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदरच्या ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी दि. २ रोजी जिते गावातील तरुणांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून येथील अनेक क्रेशर प्लांटच्या अनाधिकृत वाहतुकींच्या ओव्हरलोड गाड्या जिते खारपाडा हद्दीतून पुढे मुंबई गोवा महामार्गावर येत असून गाड्यांच्या टायरांमधून होणारे चिखलाचे साम्राज्य तसेच डंपर मधून पडणारी बारीक खडी यामुळे अनेकदा मोटरसायकलस्वरांचे येथे अपघात घडले आहेत तर काही दिवसापूर्वीच बारापाडा येथील तरुणाचे येथे पडून त्याचा मृत्यू झाला आहे.
याबाबत संबंधित प्रशासनाला अनेकदा तक्रारी, निवेदने देऊनही ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे येथील अनाधिकृत ओव्हरलोड वाहतुकीवर तातडीने कारवाई करावी अन्यथा येत्या आठ दिवसांत पेणच्या जिते येथे असणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


Be First to Comment