Press "Enter" to skip to content

हवालदार विकास साळवी यांना केंद्र सरकारचा ‘अति उत्कृष्ट सेवा पदकाने गौरव


पनवेल दि ३ (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार विकास प्रभाकर साळवी यांना ‘अति उत्कृष्ट सेवा पदकाने’ सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे नवी मुंबई पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विकास साळवी यांनी यापूर्वी एपीएमसी, कळंबोली, खारघर, सीबीडी आणि सध्या पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे आपल्या कर्तव्याची उत्तम छाप पाडली आहे. त्यांना पोलिसांचे बाळकडू घरातील वातावरणातूनच मिळाले. त्यांचे वडील प्रभाकर भालचंद्र साळवी (वय ९३ वर्षे) हे देखील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आहेत.

साळवी हे उच्चशिक्षित अन् कायद्याचा गाढा अभ्यास असलेले कर्मचारी असून पोलीस दलात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. पूर्ण केले. पोलीस सेवेत कार्यरत असताना त्यांनी मुंबई विद्यापीठातून एल.एल.बी. आणि ‘क्रिमिनोलॉजी’ विषयात एल.एल.एम.चे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे, एल.एल.एम. परीक्षेत त्यांनी मुंबई विद्यापीठात ५ वा क्रमांक पटकावला होता.

तपासातील अचूकता आणि आरोपींना जन्मठेप कायद्याचे उत्तम ज्ञान आणि उत्कृष्ट तपास कौशल्याच्या जोरावर त्यांनी गुन्ह्यांच्या तपासात पुराव्यांची अचूक साखळी तयार करून अनेक गंभीर गुन्हे सिद्ध केले. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना न्यायालयातून आजीवन कारावासाची (जन्मठेप) शिक्षा मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आलेला ४ ऑगस्ट २०१० चा खारघर येथील मन्नापुरम बँक दरोडा (२७ किलो सोने चोरी प्रकरण) आणि तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे जेलर भास्कर कचरे यांच्यावरील गोळीबार प्रकरण हे तपासाच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय ठरले आहेत.
आपल्या धडक कामगिरीने आणि कर्तव्यनिष्ठेने पोलीस दलाचा नावलौकिक वाढवणाऱ्या विकास साळवी यांच्या या बहुमानाबद्दल सर्व स्तरांतून आणि पोलीस प्रशासनातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.