
पनवेल, दि.३१ ( वार्ताहर) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विविध सामाजिक व लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एसटी स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)’ शिबिराला ४०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विभागप्रमुख यतिन देशमुख यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन जिल्हाप्रमुख दिपक निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना दिपक निकम यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविणे आणि त्यांना प्रशासकीय तसेच तांत्रिक सुविधा सहज उपलब्ध करून देणे हे पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
शिबिराच्या ठिकाणी सकाळपासूनच स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करण्याकरिता ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, विद्यार्थी यांच्यासह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तांत्रिक पथकाच्या मदतीने शिस्तबद्ध पद्धतीने तब्बल ४०० नागरिकांची अर्ज प्रक्रिया व नोंदणी पूर्ण करण्यात आली.
एसटी स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांना एसटी बस प्रवासादरम्यान रोख रकमेऐवजी डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सुलभ आणि आधुनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विभागप्रमुख प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, धनंजय पाटील, शहर संघटिका मालती पिंगळा, प्रभागप्रमुख बिपीन झुरे, जयंत पाखरे, प्रशांत नरसाळे, विकास पोवळे, शाखाप्रमुख गोविंद जोग, मृण्मय काणे, संदेश बन्ने, प्रवीण चोणकर, निखिल कांबळे, ओमकार धावडे, सीन डिसूझा तसेच महिला आघाडीच्या वैशाली थळी आणि अर्चना पाटील यांनी मोलाचे योगदान दिले.
नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करून स्मार्ट कार्ड शिबिराच्या आयोजनाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आभार मानले.


Be First to Comment