
पनवेल, दि.३१ ( वार्ताहर) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पनवेलचा समावेश असताना डान्सबारच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित होताच वारंवार केवळ पनवेलचेच नाव का घेतले जाते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ आणि २ मधील काही बार पहाटेपर्यंत सुरू राहत असल्याची चर्चा असताना, त्याकडे दुर्लक्ष करून केवळ पनवेलमधील बारवरच कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचा आरोप होत आहे.
पनवेलचा समावेश असलेल्या परिमंडळ ३ मध्ये मात्र बारमालक निर्धारित वेळेचे पालन करीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. दिलेल्या वेळेनंतर बार पूर्णपणे बंद केले जातात, असे संबंधितांकडून सांगण्यात येते. असे असताना अधिवेशन काळात डान्सबारचा विषय निघाल्यानंतर पनवेलचे नावच ठळकपणे पुढे येते, यामागील नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर शहरांतील बारकडे दुर्लक्ष का?
पनवेलव्यतिरिक्त ठाणे, भिवंडी, मुंबई, पालघर तसेच नवी मुंबई आयुक्तालयातील इतर भागांत मोठ्या संख्येने बार व ऑर्केस्ट्रा बार सुरू असल्याचे सांगितले जाते. यातील काही आस्थापनांकडून वेळेचे तसेच इतर नियमांचे उल्लंघन होत असल्याची चर्चा आहे. मात्र, अधिवेशनाच्या काळात या भागांतील बारचा नामोल्लेख क्वचितच होतो, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे.

विशेषतः नवी मुंबईतील परिमंडळ १ व २ मध्ये काही बार पहाटेपर्यंत सुरू राहत असल्याची चर्चा असून, या दाव्यांची पोलीस प्रशासनाने निष्पक्षपणे पडताळणी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करायची असेल तर ती सर्वांसाठी समान निकषाने व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘पनवेललाच टार्गेट का?’
शासनाकडून ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांना परवानगी दिली जाते. मात्र, डान्सबारचा विषय उपस्थित होताच केवळ पनवेलचे नाव वारंवार चर्चेत आणले जात असल्याने या भूमिकेमागे नेमका उद्देश काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पनवेलमधील नियमांचे पालन करणाऱ्या बारमालकांनाही सरसकट संशयाच्या भोवऱ्यात उभे करणे योग्य आहे का? असा प्रश्नही या निमित्ताने विचारला जात आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारवर कारवाई होणे आवश्यकच आहे; मात्र कारवाई करताना शहर, झोन किंवा आस्थापनानुसार भेदभाव न करता समान निकष लागू केले जावेत, अशी मागणी होत आहे. पनवेलचे नाव वारंवार डान्सबारशी जोडले जात असल्याने शहराची प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन केली जात आहे का, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, परिमंडळ १ व २ मधील बार पहाटेपर्यंत सुरू राहत असल्याच्या चर्चेबाबत तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांबाबत संबंधित पोलिस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या आरोपांची वस्तुनिष्ठ पडताळणी करूनच पुढील कारवाई होणे अपेक्षित आहे.


Be First to Comment