
पेण, दि. 29 ( वार्ताहर ) :- पेण शहरासह तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य नांव असणाऱ्या पेण एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेला मागील शंभराहून अधिक वर्षे झाली असून आजवर संस्थेच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी उच्चशिक्षित घडले असल्याने या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे संस्थापक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते आज संस्थेला राज्यस्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सदर संस्थेत शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहचले असून त्यांनी आपल्या आई- वडिलांसह संस्थेचेही नांव मोठे केले आहे.तर आतापर्यंत पेण एज्युकेशन सोसायटीने मराठी माध्यम बरोबरच इंग्रजी माध्यमचे सुद्धा शिक्षण देत रायगड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड.बापुसाहेब नेने यांच्या नंतर गेल्या काही वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष पद सांभाळणारे ॲड.मंगेश नेने यांनी महाविद्यालयाला आणखीनच गतवैभव प्राप्त करून दिले असून येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणांबरोबरच कला, कौशल्य, क्रिडा, सांस्कृतिक यासह इतरही गुण प्राप्त करून दिले आहेत. त्यामुळे या संस्थेकडे असणारा आदर्श, बहुमोल योगदान यासर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते या संस्थेला कोकण विभागीय आदर्श संस्था म्हणून राज्यस्तरीय गुणवंत पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
यावेळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ मंगेश नेने, उपाध्यक्ष संजय कडू यांच्यासह संचालक मंडळ तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.तर महाविद्यालयाला पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष तसेच संचालकांचे अनेकांकडून अभिनंदन करण्यात आले.


Be First to Comment