
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात गौरव
पनवेल (प्रतिनिधी) पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभात संस्थेचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या हस्ते संजय कदम यांचा सत्कार करण्यात आला.
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षे सातत्याने कार्य करताना त्यांनी सामाजिक प्रश्न, जनसामान्यांच्या समस्या तसेच विविध सार्वजनिक विषयांना आपल्या लेखणीतून प्रभावीपणे वाचा फोडली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत झालेला हा सन्मान त्यांच्या प्रदीर्घ पत्रकारितेचा गौरव मानला जात आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय कुलकर्णी, सचिव हरेश साठे, सदस्य प्रविण मोहोकर, लालचंद यादव आदी उपस्थित होते.
संजय कदम यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक करत उपस्थित पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील विविध घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याचा झालेला हा गौरव पनवेलच्या पत्रकारिता क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
या सत्कार सोहळ्यामुळे संजय कदम यांच्या प्रदीर्घ पत्रकारिता कारकिर्दीला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने सन्मानाची पावती मिळाली असून, त्यांच्या जीवनगौरव पुरस्काराबद्दल पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



Be First to Comment