
पनवेल : संस्कार प्रतिष्ठान अंतर्गत ऍड. सौ. सुरेखा प्रशांत भुजबळ (संगीत विशारद) संचालित स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह, ठाणा नाका रोड, पनवेल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून गुरुवर्या सौ. देवताताई प्रसाद सुतार उपस्थित होत्या. तसेच मा. डॉ. प्रियांका तेजस कांडपिळे (नगरसेविका), मा. डॉ. अस्मिता जगदीश घरत (नगरसेविका), मा. अॅड. शिवानी सुनील घरत (नगरसेविका) आणि मा. अॅड. प्रितीताई मनोज भुजबळ (भारत सरकार, नोटरी) यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, गुरुवंदना आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करून करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना मानवंदना देत विविध कलागुणांचे बहारदार सादरीकरण केले. शास्त्रीय गायन, उपशास्त्रीय गायन, सुगम संगीत, तबला, पेटी, गिटार, भरतनाट्यम तसेच नृत्य आणि वेस्टर्न डान्स अशा विविध कलाप्रकारांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि दर्जेदार सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सादर केलेला कलाविष्कार हे होते.
गुरु-शिष्य परंपरेचा वारसा जपत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही विद्यालयात विशेष भर दिला जातो.
स्वरसंस्कार संगीत विद्यालयात आज १५० हून अधिक विद्यार्थी विविध कला शिकत आहेत. विद्यालयामध्ये गायन, वादन, तबला, पेटी, गिटार, भरतनाट्यम आणि वेस्टर्न डान्स यांचे नियमित वर्ग घेतले जातात. संगीतासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कार प्रतिष्ठान अंतर्गत जिम्नॅस्टिक, तायक्वाँदो, योगा, ॲबॅकस आणि ड्रॉइंग क्लासेस यांसारखे विविध उपक्रमही राबविले जात आहेत.
हे सर्व वर्ग न्यू पनवेल, सेक्टर १५ येथे घेतले जात असून विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विद्यालयाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कला, क्रीडा, शिक्षण आणि संस्कार यांचा सुंदर समन्वय साधत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कार प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत आहे.
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि सादर केलेल्या कलाविष्कारामुळे संपूर्ण वातावरण भावपूर्ण झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि आयोजनामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. “संगीत आणि संस्कार यांची सांगड घालून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणे, हेच स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचे ध्येय आहे,” असे विद्यालयाच्या संचालिका ऍड. सौ. सुरेखा प्रशांत भुजबळ (संगीत विशारद) यांनी सांगितले.



Be First to Comment