Press "Enter" to skip to content

४२ किलोमीटर अंतराच्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल /प्रतिनिधी:
खारघरच्या निसर्गरम्य टेकड्यांवर आज ऊर्जेचा आणि उत्साहाचा एक नवा इतिहास रचला गेला. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित देशातील पहिल्या-वहिल्या ४२ किलोमीटर अंतराच्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सुमारे ९ हजार धावपटूंनी यात सहभाग नोंदवला.

पहाटे ४.३० वाजता महापौर नितीन पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, आयुक्त मंगेश चितळे, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता म्हात्रे, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, प्रभाग समिती ‘अ’ सभापती रवींद्र भगत, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त स्वरूप खारगे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्यासह महापालिका सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली.

सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी, आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांची विशेष उपस्थिती. स्पर्धेच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी आणि आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी प्रमुख उपस्थिती लावून सर्व धावपटूंचा उत्साह वाढवला व हिरवा झेंडा दाखवून त्यांना प्रोत्साहन दिले.

आंतरराष्ट्रीय ‘AIMS’ प्रमाणपत्र मिळाल्यामुळे या मॅरेथॉनला विशेष जागतिक दर्जा
या मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय ‘AIMS’ मान्यता मिळाल्यामुळे राष्ट्रीय व जागतिक स्तरावर एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. या भव्य आयोजनामुळे आगामी काळात देश-विदेशातील धावपटू आकर्षित होण्यासोबतच स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र स्पर्धा
महापौर नितीन पाटील व सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांच्या विशेष पुढाकाराने दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये सुमारे १०० दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवला. तसेच २१ किमी अर्ध मॅरेथॉनमध्ये ९ अंध धावपटूंनी धावून आपल्या अथांग जिद्दीचे दर्शन घडवले.

प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थ्यांची साथ
या स्पर्धेत नवी मुंबई मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे, माजी आयुक्त सुधाकर देशमुख, ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधावर, उपजिल्हाधिकारी राहुल सूर्यवंशी, युवराज बनगर, ठाणे पोलीस उपायुक्त शैलेश काळे, मनपा उपायुक्त जयंत जावडेकर, एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी आणि शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
​सुसज्ज आरोग्य यंत्रणा
महापालिकेच्या वतीने सर्व धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी पुरेशा रुग्णवाहिका, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि फिजिओथेरपिस्टची चोख यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
​लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही ऐतिहासिक मॅरेथॉन पनवेलकरांसाठी एक अभूतपूर्व आरोग्योत्सव ठरली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.