Press "Enter" to skip to content

संत रोहिदास महाराजांचा समतेचा संदेश प्रेरणादायी – आमदार प्रशांत ठाकूर

संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने विविध कार्यक्रम
सामाजिक समरसता, समानता आणि बंधुभावाचा संदेश देत जयंती उत्साहात साजरी होणार

पनवेल (प्रतिनिधी) संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने जिल्ह्यात विविध धार्मिक, सामाजिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. संत रोहिदास महाराजांच्या समतावादी विचारांचा प्रसार, सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ‘समरसता संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून संत रोहिदास महाराजांचा मानवतावादी आणि समतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

या अभियानाच्या नियोजनासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर रायगड जिल्हा भाजपची बैठक पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे पार पडली. या बैठकीस भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस व सभागृह नेते अॅड. प्रकाश बिनेदार, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, अनुसूचित जाती जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, बबन बारगजे, चिंतामण कडवे, बाबू गायकवाड यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, विविध सेल व मोर्चांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी संत रोहिदास महाराजांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक समरसता, समानता, बंधुभाव आणि मानवतेची मूल्ये समाजात रुजविण्याचा संकल्प केला.यावेळी उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत असलेल्या १७ मंडलांना संत रोहिदास महाराजांची प्रतिमा आणि मंगल कलश प्रदान करण्यात आले. प्रत्येक मंडलाच्या माध्यमातून जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, संत रोहिदास महाराजांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

संत रोहिदास महाराजांनी आपल्या कार्यातून जात-पात, उच्च-नीच आणि सामाजिक भेदभावाला विरोध करत समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. समाजातील प्रत्येक व्यक्ती समान आहे, हा विचार त्यांनी आपल्या अभंग आणि शिकवणीतून मांडला. त्यांच्या विचारांमध्ये समाजाला एकत्र आणण्याची आणि माणसामाणसांतील भेद दूर करण्याची मोठी ताकद आहे. त्यामुळे आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत संत रोहिदास महाराजांचे विचार अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. ‘मन चंगा तो कठौती में गंगा’ या संत रोहिदास महाराजांच्या विचारातून बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरणाची शुद्धता, सदाचार आणि मानवतेचे महत्त्व अधोरेखित होते. समाजात प्रेम, आपुलकी, परस्पर सन्मान आणि बंधुभाव वाढविण्यासाठी त्यांच्या विचारांचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे. संत रोहिदास महाराजांनी दिलेला समतेचा संदेश केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असल्याचेही यावेळी नमूद केले. जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा जागर करावा आणि ‘समरस समाज, सक्षम राष्ट्र’ या संकल्पनेला बळ द्यावे, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने संत रोहिदास महाराजांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त देशभरात ‘समरसता संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानातून सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देतानाच संत परंपरेतील महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातही या अभियानांतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उपक्रम आयोजित केले जात आहेत, त्याचप्रमाणे उत्तर रायगड जिल्ह्यातील १७ मंडलात जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले. सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन सामाजिक समरसता आणि बंधुभाव अधिक मजबूत करावा, संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा अंगीकार करावा आणि त्यांच्या मानवतावादी संदेशातून प्रेरणा घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी जयंती कार्यक्रमाची रूपरेषा यावेळी विशद केली.

उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याबाबत तसेच येत्या ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन प्रभावीपणे करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच खारघर हिल मॅरेथॉनला एआयएमएस AIMS प्रमाणपत्र प्राप्त होऊन जागतिक स्तरावरील मॅरेथॉनसाठी पात्रता मिळाल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले.महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. मनोज भुजबळ, किसान मोर्चाच्या जबाबदारीबद्दल सुनील गोगटे यांच्यासह मधु पाटील, रवींद्र भगत, अजय बहिरा आणि रवींद्र जोशी यांची प्रभाग समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा कार्यकारिणी बैठकीच्या माध्यमातून अभिनंदन करण्यात आले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.