
पनवेल, दि. २० (वार्ताहर) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कामोठे शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शैलेश गजानन पाटणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे कार्य तसेच काँग्रेस पक्षाचे पुरोगामी विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पाटणे भरीव कार्य करतील आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करतील, असा विश्वास पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षा श्रुती म्हात्रे यांनी व्यक्त केला.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर शैलेश पाटणे यांनी ही जबाबदारी केवळ पद नसून काँग्रेसची विचारधारा आणि जनतेची सेवा करण्याची मोठी संधी असल्याचे सांगितले. कामोठे शहरातील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हाध्यक्षा श्रुतीताई श्याम म्हात्रे, ज्येष्ठ नेते आर.सी. भाई घरत आणि माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांचे त्यांनी विशेष आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनासह वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कामोठे ब्लॉक काँग्रेस कमिटी अधिक सक्षम व मजबूत करण्याचा संकल्प असल्याचे पाटणे यांनी सांगितले.कामोठे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रेम, विश्वास, मार्गदर्शन आणि सहकार्य कायम मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.





Be First to Comment