
दोषींवर कठोर कारवाईची मागणी ; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील धक्कादायक घटना ; शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जळगाव (आनंद पवार)
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे येथे ग्रामसभे दरम्यान शासकीय कर्तव्य सजावत असलेले ग्रामसेवक पी.एन.पाटील यांना मारहाणीत झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत वेदनादायक,धक्कादायक आणि निषेधार्ह घटना आहे.या गंभीर प्रकरणी पारोळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सात जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेचे (B.N.S) कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका मुख्य आरोपीस अटक केली असल्याचे समजते.
मौजे शिवरे येथे सोमवार दि.१७ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी ग्रामसेवक पी.एन.पाटील (वय५२) हे आपले शासकीय कर्तव्य पार पाडत असताना जुन्या बिलाच्या कारणावरून काही ग्रामस्थांनी त्यांच्याशी अरेरावी करत हुज्जत घालुन वाद निर्माण केला या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. यावेळी उपस्थित असलेल्या काही मंडळींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला जात असून मारहाणी नंतर ते आपला जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून बाहेर जात असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.सदर घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे आपल्या स्टाफसह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे फिरवली.
ग्रामसभा ही लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांच्या सहभागाचे पवित्र व्यासपीठ असताना याच ठिकाणी शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या ग्रामसेवकाचा मृत्यू होणे ही बाब संपूर्ण प्रशासन आणि समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय ठरली आहे.ग्रामसभेदरम्यान घडलेल्या या अमानुष घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत असून,या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी होत आहे.शासकीय अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांच्या सेवेसाठी गावपातळीवर काम करीत असतात.ग्रामसभा,शासकीय बैठका अथवा प्रशासकीय कामकाजाच्या वेळी त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची आहे.त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी ग्रामसेवकांसह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात.अशी मागणी करण्यात येत आहे.
लोकशाहीच्या व्यासपीठावर मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.मात्र मतभेदांचे रूप हिंसाचारात किंवा जीवघेण्या हल्ल्यात होणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. ग्रामसभा ही विकास आणि लोकशाही चर्चेची जागा आहे,हिंसाचाराची नव्हे! त्यामुळे या घटनेतील सत्य जनतेसमोर आणून दोषींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.ग्रामसेवक पी.एन.पाटील यांच्या दुर्दैवी निधनाने त्यांच्या कुटुंबीयासह आप्तेष्ट नातेवाईक व मित्रपरिवारावर मोठा आघात झाला आहे.
दरम्यान कर्तव्य बजावणारे ग्रामसेवक पी.एन.पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक १८ऑगस्ट रोजी पारोळा तालुक्यातील बोदर्डे या त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी तडजोड नको
दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे!असा सुर सर्वसामान्य जनतेतून उमटु लागला आहे.
या गंभीर घटनेचे गंभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,चोपडा येथील पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं.३१५/२०२६ BNS कलम१०५(सदोष मनुष्यवध) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एका मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.घटनेचा पुढील तपास पारोळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन हे करित आहेत.



Be First to Comment