Press "Enter" to skip to content

भरतशेठ गोगावले रायगडच्या पालकमंत्रिपदी

पनवेलमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष ! फटाके वाजवून, पेढे वाटून कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

पनवेल : प्रतिनिधी


तब्बल दोन वर्षांपासून पालकमंत्रीपदापासून वंचित असलेल्या रायगड जिल्ह्याला अखेर पालकमंत्री मिळाला आहे. भरतशेठ गोगावले यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर पनवेलमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. शिवसेना कार्यालयासमोर फटाके वाजवून तसेच पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी प्रतिक्रिया देताना शिवसेना पनवेल उपजिल्हाप्रमुख परेश पाटील म्हणाले की, श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भरतशेठ गोगावले यांची पालकमंत्री म्हणून घोषणा केल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गोगावले हे सर्वसामान्य आणि गरिबांच्या प्रश्नांसाठी काम करणारे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनीही गोगावले यांच्या नियुक्तीचे स्वागत करत, अनेक वर्षांनंतर रायगडला सक्षम पालकमंत्री लाभल्याचे सांगितले. समाजातील सर्व घटकांना न्याय देत विकासाची गती वाढविण्याचे काम भरतशेठ गोगावले करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या नियुक्तीमुळे गोगावले यांना योग्य न्याय मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्रीपदाची घोषणा होताच पनवेल शहरात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, महिला तालुकाप्रमुख मंदाताई जंगले, उपमहानगरप्रमुख सचिन मोरे व महेश सावंत, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, खारघर शहरप्रमुख प्रसाद परब, तळोजा शहर संघटक राहुल कदम, महिला उपतालुकाप्रमुख स्मिताताई भोईर, नैना सुरते, युवासेना विधानसभा संपर्कप्रमुख अभिनय सोमण, युवासेना खारघर शहरप्रमुख तौफिक बागवान, गुलाब बागवान यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.