Press "Enter" to skip to content

खारघरमधील स्पामध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश; तीन पीडित महिलांची सुटका, व्यवस्थापकासह एकाला अटक


पनवेल, दि. १० (वार्ताहर) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने खारघर येथील एका स्पा सेंटरवर धाड टाकून मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पाच्या व्यवस्थापकासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे तसेच पोलीस उपआयुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या आदेशानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार खारघर सेक्टर-७ येथील ‘ग्रेसफुल टच सलून अँड स्पा’ येथे बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करण्यात आली. संकेत मिळताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

छाप्यात स्पामध्ये देहव्यापारासाठी ठेवण्यात आलेल्या तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तपासादरम्यान स्पाचा व्यवस्थापक आरिफ अजीज मन्सुरी (वय ३५) याने बनावट ग्राहकाकडून ५,००० रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. तसेच स्पा मालक पूजा पटेल उर्फ झिनत दरबेज पटेल आणि आसिफ खान यांनी संगनमताने महिलांना मसाजच्या नावाखाली ठेवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याचे उघड झाले.

या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास खारघर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त शैलेशकुमार अंचलवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे, पोलीस हवालदार पाटील, म्हात्रे, अडकमोल, हांडे पोलीस शिपाई ठाकूर, चव्हाण, पारसुर, आव्हाड,  कोलते यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.