
आंतरराष्ट्रीय मांजर दिनानिमित्त २०० हून अधिक मांजरप्रेमींची उपस्थिती
खोपोली : प्रतिनिधी
आपल्या कुशीत अलगद येऊन विसावणारे, पावलांची चाहूल लागताच शेपटी उंचावून स्वागत करणारे आणि न बोलताही माया लावणारे … मांजरांचे हे विश्वच काही और! याच निरागस सहवासाचा आणि प्राणीप्रेमाचा उत्सव खोपोलीत अनुभवायला मिळाला.
आंतरराष्ट्रीय मांजर दिनाचे औचित्य साधून ८ ऑगस्ट २०२६ रोजी श्री कृपा एक्वेरियम व पेट केअर सेंटर येथे हेल्प फाउंडेशनच्या सहकार्याने विशेष आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला शहर व परिसरातील २०० हून अधिक मांजरप्रेमींनी आपल्या लाडक्या मांजरांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


कार्यक्रमादरम्यान मांजरांच्या संगोपनासंदर्भात विविध उपयुक्त माहिती देण्यात आली. योग्य आहार, आरोग्य, स्वच्छता आणि सुदृढतेसाठी आवश्यक काळजी याबाबत पशुवैद्यकीय मार्गदर्शन मिळाल्याने उपस्थितांसाठी हा उपक्रम माहितीपूर्ण ठरला. या वेळी डॉ. विष्णू काळे आणि डॉ. सरदार यांनी उपस्थिती लावत मांजरांच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर मार्गदर्शन केले. आपल्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्याबाबत असलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी अनेकांनी तज्ज्ञांशी संवाद साधला.
मांजरप्रेमींसाठी आणखी एक आकर्षण ठरले ते विविध कंपन्यांच्या उत्पादनांचे वितरण. ड्रूल्स फूड, सिग्नेचर, झूमिस पेट्स परपोरेटो, अवंती फूड, ऑरेंज पेट फूड, जेनेक्स, सावा वेट इत्यादी कंपन्यांच्या माध्यमातून फूड सॅम्पल्स, सप्लिमेंट्स, पशुखाद्य, औषधे, शाम्पू तसेच विविध भेटवस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या.
दिवसभराच्या या उपक्रमातून खोपोलीतील प्राणीप्रेमाची सकारात्मक बाजू अधोरेखित झाली. आपल्या लाडक्या मांजरांसोबत वेळ घालवताना अनेकांनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. प्राण्यांवरील प्रेम, जबाबदार संगोपन आणि माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील भावनिक नाते यांचा सुंदर संगम या निमित्ताने पाहायला मिळाला. त्यामुळे हा केवळ एक कार्यक्रम न राहता आजच्या धावपळीच्या जीवनात मांजरासारखे पाळीव प्राणी देखील कुटुंबाचा भाग आहेत हा जिव्हाळ्याचा संदेश देणारा अनुभव ठरला.




Be First to Comment