
नागोठणे : याकूब सय्यद
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे येथील कंपनीच्या मटेरियल गेटमधून दोन सशस्त्र बंदूकधारी अतिरेकी सुरक्षारक्षकांना घायाळ करून कंपनीच्या आर्पेट प्लांटमध्ये घुसल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंपनी प्रशासनाने आणि स्थानिक पोलीस यंत्रणेने अत्यंत वेगाने आणि कुशलतेने संयुक्त ‘लेव्हल टू मॉक ड्रिल’ (Mock Drill) यशस्वीरीत्या पार पाडले.
घटनाक्रम आणि तातडीची उपाययोजना
कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित उपाययोजना सुरू केली. कंपनीच्या एसएसएम ऑफिसला सूचना मिळताच त्यांनी हेड एच.आर., कॉर्पोरेट अफेयर्स डिपार्टमेंट, सर्व डिपार्टमेंट हेड, फायर ब्रिगेड आणि फॅमिली वेल्फेअर सेंटरला सतर्क केले.
कंपनीच्या ‘आर.जी.एस.एस.’ (RGSS) सिक्युरिटी एजन्सीने मार्केटिंग बिल्डिंगच्या कंट्रोल रूमचा ताबा घेऊन पुढील कार्यवाहीबाबत संबंधितांना सूचना दिल्या. कॉर्पोरेट अफेयर्स डिपार्टमेंटकडून नागोठणे पोलीस स्टेशन, रायगडचे पोलीस अधीक्षक (SP), रोहाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP), जिल्हाधिकारी कार्यालय (रायगड-अलिबाग), प्रांताधिकारी कार्यालय (रोहा व पेण), तसेच तहसीलदार (रोहा व पेण) यांना घटनेची माहिती देण्यात आली. रोहाचे DySP प्रसाद गोकुळे यांनी तत्काळ संबंधित पोलीस यंत्रणेला कार्यवाहीचे आदेश दिले.
पोलिसांची धडाकेबाज कारवाई व ओलिसांची सुटका
नागोठणे पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी आपले कौशल्य पणाला लावून क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), आरसीपी राईट कंट्रोल प्लेटून, बॉम्ब डिटेक्शन डिस्पोजल स्क्वाड (BDDS), तसेच अँटी टेररिस्ट स्क्वाड (ATS) च्या रोहा आणि मुंबई डिव्हिजनच्या तुकड्यांना त्वरित पाचारण केले.
अतिरेक्यांनी आर्पेट प्लांटच्या कंट्रोल रूमचा ताबा घेऊन तिघा जणांना ओलीस ठेवले होते आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके होती. कंट्रोल रूमच्या मॉनिटरवरून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. संबंधित पोलीस यंत्रणेने सर्व बाबींचा विचार करत अत्यंत धैर्याने अतिरेक्यांपर्यंत पोहोचत ओलिसांची सुटका केली आणि दोन्ही अतिरेक्यांना जेरबंद करून या धोकादायक ‘लेव्हल टू मॉक ड्रिल’चे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण केले.
प्रमुख अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य
पोलीस व सुरक्षा यंत्रणा: रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली DySP प्रसाद गोकुळे यांनी कामकाज पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस तुकड्यांनी हे अभियान चोखपणे पार पाडले. आरजीएसएस ग्रुपचे कर्नल गोपाल कृष्णन व अमित तायडे यांनी सिक्युरिटी यंत्रणा कार्यान्वित करून पोलिसांना मोलाची साथ दिली.
कंपनी प्रशासन व विभाग: कॉर्पोरेट अफेयर्सचे अनिल डांगी व रमेश धनावडे यांनी सरकारी यंत्रणा व पत्रकारांना मिनिट-टू-मिनिट माहिती दिली. एच.एस.एफ. विभागाचे सचिन भागवत व निलेश दांडेकर यांनी फायर ब्रिगेड व ॲम्बुलन्स सेवांचे चोख व्यवस्थापन पाहिले.
मॉक ड्रिल यशस्वी करण्यासाठी हेड एच.आर. कौशिक चक्रवर्ती, कर्नल गोपाल कृष्णन, अमित तायडे, कैलाशनाथ महाडिक, अनिल डांगी, रमेश धनावडे, निलेश दांडेकर, फायर डिपार्टमेंटचे संजय कांबडी, फॅमिली वेल्फेअर सेंटरचे आर.एम.ओ. सुनील चौधरी, इस्टेट ऍडमिनिस्ट्रेशन प्रमुख रोहिताश शर्मा, अजिंक्य पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने कठोर परिश्रम घेतले. यावेळी सर्कल अधिकारी सुवर्णा पवार, दिलीप खंडारे, प्रवीण साळुंखे आणि योगेश वार्डे आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.





Be First to Comment