
पनवेल (प्रतिनिधी) : “हर घर तिरंगा” अभियान हे केवळ एक उपक्रम नसून प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणारा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि यशस्वी नियोजन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कोकण व ठाणे विभागाची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) पनवेल येथे पार पडली.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी अभियान संयोजक तथा प्रदेश महामंत्री योगेश सागर, सहसंयोजक तथा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, नगरसेवक सुमित झुंजारराव, विकास घरत, दिनेश खानावकर, पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ यांच्यासह कोकण व ठाणे विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीचा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावा आणि प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकावा, या उद्देशाने बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी “हर घर तिरंगा” अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. देशप्रेम, राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.


Be First to Comment