Press "Enter" to skip to content

खारघरच्या पाणीटंचाईवरून सिडकोला नागरिकांचा घेराव; तीन तास आंदोलन, दोन तास चर्चेनंतर १५ दिवसांत उपाययोजनांचे लेखी आश्वासन

खारघर : प्रतिनिधी

राज्यभर मुसळधार पाऊस सुरू असतानाही खारघर परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजपचे नगरसेवक समीर कदम आणि उषा अडसुळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी सिडकोच्या रायगड भवन कार्यालयावर धडक मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले. जवळपास तीन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सिडको कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनादरम्यान नागरिकांनी सिडको प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांवर जाब विचारला.

आंदोलनकर्त्यांनी खारघरमध्ये नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यभर पावसाने जोर धरला असतानाही खारघरकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे सांगत सिडकोच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. विशेष म्हणजे, पाणीटंचाईमागे टँकर लॉबीला जास्त प्राधान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला. नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्याऐवजी टँकर व्यवस्थेला चालना दिली जात असल्याने नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे यावेळी नगरसेवक समीर कदम यांनी सांगितले दर सोमवारी केली जाणारी पाणी कपात बंद करून पाणी सोडण्याची वेळ निश्चित करावी हा विषय आंदोलनाचा प्रमुख मुद्दा ठरला.

आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या नियमित पाणी कपातीची कोणतीही स्पष्ट तरतूद किंवा आदेश नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी देखील केला. मग ही पाणी कपात नेमकी कोणाच्या आदेशाने केली जाते, असा थेट सवाल सिडको अधिकाऱ्यांना करण्यात आला. याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सिडको प्रशासनाने आंदोलनाच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले. त्यानंतर सुमारे दोन तास सिडकोचे अधिकारी, नगरसेवक समीर कदम व नगरसेविका उषा अडसुळे, आणि सोसायटी यांच्या प्रतिनिधींमध्ये सविस्तर बैठक पार पडली.

बैठकीत पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्न, नागरिकांच्या तक्रारी आणि उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर सिडको प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत १० ते १५ दिवसांची मुदत मागितली. या कालावधीत वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन पाणीपुरवठा वाढविणे, उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि नागरिकांना अधिक प्रभावीपणे पाणीपुरवठा करण्याबाबत आवश्यक निर्णय घेण्यात येतील, असे लेखी आश्वासन सिडकोकडून देण्यात आले. संबंधित आश्वासनाचे पत्र आंदोलनकर्त्यांना सुपूर्द करण्यात आले.

दरम्यान, पाणीटंचाईबाबत स्पष्टीकरण देताना सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले की, यंदा जुलै महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली असली तरी त्यापूर्वी धरणातील पाणीसाठा अवघ्या दहा टक्क्यांवर आला होता. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करून पुरवठा करावा लागला. आता धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढत असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. तसेच नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सिडकोच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी दिलेल्या मुदतीत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक समीर कदम व उषा अडसुळे तसेच आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.