

मृत्यूच्या दाढेतून महामार्ग पोलिसांनी चालकाला खेचून आणले !
३ ऑगस्ट : खालापूर तालुक्यातील गारमाळ रस्त्यावर मार्गावरून सोमवारी सकाळी थरारक अपघात घडली. कनेक्टिंग लिंक वरील ब्रिजचे विहंगमय दृश्य पाहण्याच्या मोहापायी चालकाने कार कच्च्या रस्त्यावर नेल्याने नियंत्रण सुटले आणि कार तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळली. चार ते पाच पलट्या खात दरीत पडलेल्या कारकडे पाहणाऱ्यांनी चालक वाचण्याची आशाच सोडली होती. मात्र, महामार्ग पोलिसांनी तातडीने राबविलेल्या धाडसी बचाव मोहिमेमुळे चालकाला मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः खेचून बाहेर काढण्यात यश आले.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट येथील प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. दरीत उतरणे धोकादायक असतानाही पोलीस कर्मचारी संदीप पवार, किरण शिंदे, भरत पावरा, गणेश खाडे आणि संतोष गुजरवार आणि गोडसे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्थानिकांच्या मदतीने दरीत उतरून कारमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघातात चालक मोहित स्वरूप भटनागर (वय ५१, रा. गुरुग्राम, हरियाणा) यांना किरकोळ दुखापत झाली असून, काही क्षणांचा उशीर झाला असता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महामार्ग पोलिसांनी दाखविलेली प्रसंगावधानता, धाडस आणि तत्परता यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला असून, या बचावकार्यासाठी महामार्ग पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Be First to Comment