

गरजू नागरिक, ज्येष्ठ आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक
पनवेल (प्रतिनिधी) नेत्याची खरी ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमांमुळे पक्षाची ताकद अधिक मजबूत होते. जयेंद्र जोशी आणि रवींद्र जोशी यांनी आयोजित केलेल्या समाजोपयोगी उपक्रमातून हीच सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देण्याऐवजी तसेच बॅनर लावण्याऐवजी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जयेंद्रशेठ जोशी युवा मंच आणि रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठे सेक्टर ३६ येथील मसाला मंत्रा हॉल येथे समाजोपयोगी वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप केले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या उपक्रमांतर्गत गरजू नागरिकांना मधुमेह तपासणी किट, ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन वापरासाठी वॉकिंग स्टिक, तर शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. परिसरातील शेकडो नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे गरजू नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला.
कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, नगरसेवक रवी जोशी, डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, प्रदीप भगत, हॅप्पी सिंग,नगरसेविका शीला भगत, हेमलता गोवारी, आयोजक जयेंद्र जोशी, राजेश गायकर, हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Be First to Comment