
शिक्षण क्षेत्रात सुसूत्रता आणण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्स चा वापर ही काळाची गरज — सुप्रसिद्ध विकासक अशोक छाजेड
देशातील युवा वर्गाने उत्स्फूर्तपणे केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अरिहंत सुपर स्ट्रक्चर लिमिटेड चे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर अशोक छाजेड यांनी शिक्षण प्रणाली मधील परीक्षा घेण्याची यंत्रणा राबविण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत आवश्यक असल्याची भूमिका मांडली आहे. प्रसार माध्यमांना त्यांनी आपली भूमिका विशद करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.
अशोक छाजेड म्हणाले की युवा वर्गाच्या आंदोलनाला मिळालेले यश पाहता आजही देशामध्ये असलेले संविधान आणि त्याची ताकद अधोरेखित होते. या आंदोलनाच्या मुळाशी असणाऱ्या पेपर फुटीच्या प्रकरणाबद्दल अशोक छाजेड यांनी अत्यंत परखड मत मांडताना सांगितले की उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा ही त्यांच्या करिअरसाठी अनन्यसाधारण महत्त्व बाळगून असते. म्हणूनच ही यंत्रणा कठोर शिस्तीने आणि अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करावाच लागेल.
संबंधित विषयातील प्राध्यापकांकडून संभाव्य १०० प्रश्न संच तयार करुन ते फीड सिस्टीम मध्ये नोंदवावे. प्रवेश परीक्षा अथवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा वेळेच्या अगदी ३० मिनिटे अगोदर बनविणे देखील या प्रणालीमुळे सहज शक्य आहे. या सगळ्याचा कंट्रोल स्वतः शिक्षण मंत्री देखील ठेवू शकतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केवळ एका बटनाच्या आधारे परीक्षा घेणाऱ्या केंद्रांवरती प्रश्नपत्रिका पोहोचविल्या जाऊ शकतात. अत्याधुनिक प्रणालीमुळे प्रश्नपत्रिकांची हाताळणी करणारी माणसे आणि हाताळणी करणारा वेळ जर कमी झाला तर भविष्यात पेपर फुटी सारखी प्रकरणे होणारच नाहीत.
याच प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तर पत्रिका स्कॅन करून ते स्वतः कडे ठेवण्याची यंत्रणा राबवावी लागेल. एखाद्या विद्यार्थ्याला पुनर्तपासणी करण्यासाठी ते सोयीचे ठरेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीच्या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर केल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षांना शिस्त लावता येईल. या परीक्षा विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याची पहिली पायरी आहे. अनेक महत्त्वकांक्षी मुले डोळ्यांमध्ये स्वप्न घेऊन परीक्षांची तयारी करत असतात म्हणूनच ही यंत्रणा पारदर्शक पद्धतीने राबविणे ही काळाची गरज बनली आहे. त्याकरता आर्टिफिशल इंटेलिजन्स यंत्रणेचा वापर करावाच लागेल.


Be First to Comment