Press "Enter" to skip to content

कुस्ती महर्षी रायगड केसरी २०२६ स्पर्धा जल्लोषात संपन्न


जयेश खरमारे रायगड केसरी, दिवेश पालांडे उपविजेता, मानाच्या गदेसह गौरव

खोपोली : प्रतिनिधी

कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास, खोपोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली “कुस्ती महर्षी रायगड केसरी २०२६” ही भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा काशी स्पोर्ट्स क्लब, खोपोली येथे उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात पार पडली. दिवसभर रंगलेल्या चुरशीच्या कुस्त्यांनी हजारो कुस्तीप्रेमींना अक्षरशः खिळवून ठेवले.

रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेकडो मल्लांनी स्पर्धेत सहभाग घेत आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन केले. वरिष्ठ पुरुष, महिला तसेच १६ वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध वजनगटांतील सामने अत्यंत रंगतदार झाले. प्रत्येक लढतीला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. सोहेल शेख,क्षितिजा मरागजे, काव्या मरागजे, ओमकार निंबळे यांच्या कुस्त्या प्रेक्षणीय झाल्या.

स्पर्धेतील प्रतिष्ठेच्या रायगड केसरी किताबासाठी झालेल्या अंतिम लढतीत जयेश अरुण खरमारे (खालापूर) याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत “रायगड केसरी २०२६” हा मानाचा किताब पटकावला. तर दिवेश दत्तात्रय पालांडे (खालापूर) याने उपविजेतेपद मिळविले. विजेता आणि उपविजेता या दोन्ही मल्लांचा मानाची गदा, रोख पारितोषिक, पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यामध्ये पुरुष विभागातील विजेत्यास कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या स्मरणार्थ मानाची गदा, तर महिला विभागातील विजेत्यास स्व. किसन मामा शेलार यांच्या स्मरणार्थ मानाची गदा प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे स्पर्धेला एक वेगळी ऐतिहासिक आणि भावनिक उंची लाभली.

रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष परेश ठाकूर, खालापूर तालुका पंचायत समितीचे सभापती कृष्णाजी पारंगे, रायगड जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे, खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, खालापूर तालुका पंचायत समितीचे सदस्य रघुनाथ उर्फ भाई शिंदे, नगरसेविका प्रतीक्षा रेटरेकर, नगरसेविका सानिया शेख, सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत शेलार, विठ्ठल मोरे, किशोर ओसवाल, दिलीप म्हसे, किशोर शिंदे, ॲड जयेश तावडे, तानाजी चव्हाण, महेंद्र सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेदरम्यान लाभली.

उपस्थित मान्यवरांनी कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या कार्याचा गौरव करत रायगड जिल्ह्यातील कुस्ती परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी अशा स्पर्धा सातत्याने आयोजित होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यासाचे अध्यक्ष राजाराम कुंभार, सचिव जगदीश मरगजे तसेच सर्व पदाधिकारी, पंच, प्रशिक्षक, स्वयंसेवक, हेल्प फाउंडेशनचे सदस्य आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनबद्ध परिश्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन, चुरशीच्या लढती, मानाच्या गदांचा गौरव आणि कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे “कुस्ती महर्षी रायगड केसरी २०२६” ही स्पर्धा रायगडच्या कुस्ती इतिहासातील एक अविस्मरणीय पर्व ठरली. आयोजकांनी पुढील वर्षी ही स्पर्धा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.