
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः कळंबोली सर्कल ते मुंब्रा रोडवरील कळंबोली पुलाच्या सुरुवातीला उभारलेले एक मोठे लोखंडी होर्डिंग मंगळवारी अचानक कोसळल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.
प्रत्यक्षदर्शी ट्रक चालक आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्डिंग अचानक रस्त्यावर कोसळल्याने वाहनचालकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने त्या वेळी होर्डिंगच्या खाली कोणतेही वाहन अथवा नागरिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, संबंधित प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेले लोखंडी स्ट्रक्चर आणि इतर साहित्य हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला असला, तरी प्रशासनाच्या तत्परतेमुळे वाहतूक सुरळीत करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेनंतर पुलावरील होर्डिंगच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा संरचनांची तातडीने तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


Be First to Comment