

न्यूयार्क : क्रिकेटची प्रचंड आवड असणारे महेंद्रशेठ घरत हे फुटबॉलप्रेमीही आहेत, याचा प्रत्यय नुकताच आला. जगभरातील बहुसंख्य क्रीडारसिक टीव्हीवर फुटबॉलचा आनंद घेत असताना महेंद्रशेठ घरत मात्र थेट अमेरिकेत गेले, तिथे न्यू जर्सीतील मेटलाईफ स्टेडियमवर फिफा वर्ल्ड कप फुटबॉलची अंतिम झुंज त्यांनी पाहिली. फुटबॉलचा तो थरार प्रत्यक्ष मैदानावर ‘याचि देही याचि डोळा’ पाहाण्याची संधी महेंद्रशेठ घरत यांनी साधली तीही कुटुंबासह.
जगभरातील फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणी घेऊन येणारा फिफा वर्ल्ड कप हा दर चार वर्षांनी होतो. तोपर्यंत क्रीडा रसिकांना वाट पाहावी लागते. त्यामुळे जगाचे लक्ष लागलेला फिफा वर्ल्ड कप-२०२६ फायनलचे महेंद्रशेठ घरत हे साक्षीदार ठरले आहेत. त्यांच्यासोबत सौभाग्यवती शुभांगीताई घरत, कुणाल घरत होते. त्यामुळे फुटबॉलच्या अंतिम सामन्याची झुंज प्रत्यक्ष मैदानावर पाहाणारे महेंद्रशेठ घरत हे आगरी समाजातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व असल्याचा समाजबांधवांचा समज आहे.
अमेरिकेतून दूरध्वनीवरून बोलताना महेंद्रशेठ घरत म्हणाले, “आयुष्यात अनेक स्वप्न आपण पाहत असतो, पण ती पूर्ण होतात असे नाही, मात्र फिफा वर्ल्ड कप फायनल पाहाण्याचे माझे स्वप्न कुटुंबसह पूर्ण झाल्याने मी अत्यानंदात आहे. अंतिम सामन्यातील अर्जेंटिना-स्पेन ही लढत डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. रसिकांनी खचाखच भरलेल्या मेटलाईफ स्टेडियममधील दोन्ही संघांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरील हाव-भाव पाहाताना अंगावर रोमांच उभे राहिले होते. स्पेन जिंकल्यानंतर त्यांचे चाहते आनंदाने बेहोश झाले होते, तर अर्जेंटिनाच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले होते. स्पेनच्या फेरान टोरेसने अवघ्या ३७ सेकंदात केलेला गोल कुणीही विसरू शकत नाही. अर्जेंटिना-स्पेनचा तो आक्रमक खेळ पाहून मन तृप्त झाले आणि अंतिम सामना पाहाण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले.”
महेंद्रशेठ घरत हे जगभ्रमंती करणारे, कलाप्रेमी आणि दानशूर म्हणून प्रसिद्ध आहेतच, परंतु सच्चे पाईक म्हणून ते क्रीडाप्रेमीही तेवढेच आहेत, हे त्यांच्या फुटबॉलवरील प्रेमाने दिसून आले आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना जगात कुठेही असला तरी ते आवर्जून पाहायला जातात. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कामगार आणि क्रीडा क्षेत्रांत महेंद्रशेठ घरत यांनी आजपर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. थोडक्यात ते एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत.


Be First to Comment