Press "Enter" to skip to content

कल्पतरू इमारतीजवळ गाढी नदीपात्रात अनोळखी तरुणाचा मृतदेह; पाण्याच्या प्रवाहात वाहून आल्याचा प्राथमिक संशय


पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील कल्पतरू इमारतीलगत असलेल्या उद्यानाजवळील गाढी नदीच्या पात्रात मंगळवारी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. पुराच्या पाण्याच्या प्रवाहासोबत हा मृतदेह वरच्या भागातून वाहून आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांना नदीपात्रातील कचरा आणि चिखलामध्ये एक मृतदेह पडलेला दिसून आला. त्यांनी तत्काळ याबाबत पनवेल शहर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आवश्यक पंचनामा करून मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे 25 ते 35 वर्षे असून त्याच्या अंगावर मोजकेच कपडे आढळले आहेत. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून परिसरातील तसेच लगतच्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी करण्यात येत आहे.

दरम्यान, हा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाला आहे की त्यामागे अन्य काही कारण अथवा घातपात आहे, याचा तपास पोलीस सर्व बाजूंनी करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. पावसाळ्यात नदी-नाल्यांमध्ये पाण्याचा वेग वाढत असल्याने अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.