Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाची कास धरावी – सुविद्य गावंड

संग्राम ठाकूर – उरण | रायगड

आधुनिक युग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचे युग असून विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत तांत्रिक शिक्षणाची कास धरणे ही काळाची गरज आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा प्रभावी वापर करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य सुविद्य गावंड यांनी अकरावीच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रमात केले.

ते पुढे म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेतील शिक्षण घेत असताना आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा अभ्यास करून त्यांचा सकारात्मक वापर करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी. यामुळे भविष्यातील स्पर्धात्मक जगात यश मिळविणे अधिक सुलभ होईल.

यावेळी रामचंद्र म्हात्रे विद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दहावीनंतरचा अकरावीचा टप्पा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. भविष्यातील यशस्वी वाटचालीचा हा श्रीगणेशा असून विद्यार्थ्यांनी नवीन दिशा, नवीन संधी आणि नवीन ध्येय स्वीकारताना शिस्त, सातत्य आणि परिश्रम यांना प्राधान्य द्यावे. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली ठरते, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या प्रतिमेचे पूजन, सरस्वती पूजन, ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली.
या कार्यक्रमाला शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे महाविद्यालयाचे प्राचार्य सुविद्य गावंड, रामचंद्र म्हात्रे विद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर, शरद केणी, पत्रकार संग्राम ठाकूर तसेच पालक प्रतिनिधी सुवर्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी गोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन निवास गावंड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अकरावीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.