

पनवेल, दि. १७ जुलै :
माननीय पोलीस आयुक्त (वाहतूक) डॉ. राहुल खाडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘पोलीस शाळा दत्तक योजना’ व ‘पोलीस बाल सुरक्षा अभियान’ अंतर्गत सेंट विल्फ्रेड हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, शेंडून टोलनाका येथे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमांविषयी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमात वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संजय गावडे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर वाघ आणि पोलीस हवालदार जितेंद्र कदम यांनी विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे महत्त्व अत्यंत सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे सिग्नल व नियमांचे काटेकोर पालन करणे, दुचाकी वाहन चालविताना दर्जेदार हेल्मेटचा वापर करणे, चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट लावणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, विरुद्ध दिशेने वाहन न चालविणे, तसेच स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपणे याबाबत सविस्तर प्रबोधन करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असा संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या कार्यक्रमास पोलीस नाईक प्रदीप जाधव व पोलीस शिपाई राकेश बर्डे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमात सुमारे ३०० ते ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ. स्वाती येवले यांनी नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेल्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
सकाळी १०.३० ते ११.२० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्त, रस्ते सुरक्षा आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव अधिक दृढ झाल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला.



Be First to Comment