
रोहा : समीर बामुगडे
रोहा तालुक्यातील धोंडखार ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (बाळासाहेब ठाकरे) जाहीर प्रवेश करत भगवा हाती घेतला आहे. या पक्षप्रवेशामुळे धोंडखारच्या राजकीय वर्तुळात शिवसेनेची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
शिवसेना प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, तसेच धोंडखारमधील शिवसेनेच्या प्रभावी संघटनशक्ती आणि जनतेशी असलेल्या सातत्यपूर्ण संपर्कामुळे प्रेरित होऊन माजी सदस्य गणेश गावडे, महादेव मोरे, शांताराम मोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या पक्षप्रवेशावेळी शिवसेना उपविभागीय प्रमुख शैलेश सकपाळ, युवासेना उपतालुका प्रमुख सुदर्शन गावडे, शिवसेना शाखाप्रमुख सनी महादेव म्हात्रे, उपशाखाप्रमुख मिथुन घाणेकर तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या सहकाऱ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी शिवसेनेची विकासाभिमुख भूमिका, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी भूमिका आणि स्थानिक नेतृत्वाची कार्यक्षम शैली यावर विश्वास व्यक्त केला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्यासाठी शिवसेना हेच सक्षम व्यासपीठ असल्याची भावना नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
शाखाप्रमुख सनी महादेव म्हात्रे यांनी सांगितले की, धोंडखारमध्ये शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून हा केवळ पक्षप्रवेश नसून गावाच्या विकासासाठी जनतेने शिवसेनेवर व्यक्त केलेला विश्वास आहे. आगामी काळात विविध पक्षांतील आणखी अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील. ग्रामपंचायत निवडणुकीत धोंडखारवर भगवा फडकविण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला असून संघटन अधिक मजबूत करून जनतेच्या सेवेसाठी पूर्वीपेक्षा अधिक जोमाने काम केले जाईल.
या घडामोडीमुळे धोंडखारच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना अधिक ताकदीने मैदानात उतरणार असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. शिवसेनेच्या वाढत्या जनाधारामुळे विरोधकांचे राजकीय गणितही विस्कळीत होण्याची चिन्हे दिसत आहेत.



Be First to Comment