
पनवेल : रायगड जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने कजउङ, पिल्लई (रसायना) येथे आयोजित करण्यात आलेल्या सुब्रतो कप अंडर-१५ मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत हिरानंदानी ट्रस्ट स्कूलने सलग तिसऱ्या वर्षी अजिंक्यपद पटकावत आपल्या वर्चस्वाची पुन्हा एकदा प्रचिती दिली.
अंतिम सामन्यात संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्तबद्ध बचाव आणि प्रभावी आक्रमणाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजेतेपदावर नाव कोरले. सलग तीन वर्षे सुब्रतो कप जिंकण्याची उल्लेखनीय कामगिरी करत हिरानंदानी ट्रस्ट स्कूलने रायगड जिल्ह्यातील शालेय फुटबॉलमध्ये आपला दबदबा कायम राखला आहे.
या यशामागे प्रशिक्षक प्रणव लबडे यांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण आणि खेळाडूंची मेहनत महत्त्वाची ठरली. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. रुपा चौधरी यांनी विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षक प्रणव लबडे यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी मुंबई विभागीय (झोनल) सुब्रतो कप स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा देत, पुढील फेरीतही उत्कृष्ट कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला.



Be First to Comment