Press "Enter" to skip to content

विशाल मनोहर सावंत मित्र परिवाराच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप!


​पनवेल / प्रतिनिधी:
विशाल मनोहर सावंत मित्र परिवार यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत बोंडारपाडा जिल्हा परिषद शाळा आणि दुंदरे आदिवासी वाडी येथील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

गरीब व गरजू मुले केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत, याच उदात्त उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
​याप्रसंगी बोलताना ‘एस.पी. इन्फ्रा’चे शैलेश गायकवाड यांनी मित्र परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे आणि ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची साधने पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. आजच्या काळात दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या वह्यांचा योग्य वापर करून जिद्दीने अभ्यास करावा व आपले भविष्य उज्ज्वल करावे. विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आमचा मित्र परिवार नेहमीच प्रयत्नशील राहील.”

यानंतर दुंदरेचे माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक उलवेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विशाल मनोहर सावंत मित्र परिवाराच्या माध्यमातून नेहमीच असे विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. केवळ वह्या वाटपच नव्हे, तर लॉकडाऊनच्या कठीण काळातही या परिवाराने संयुक्तरीत्या अनेक ठिकाणी गरजूंना धान्य वाटप केले होते. तसेच महाड येथील पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. संकटसमयी किंवा कोणत्याही आपत्तीमध्ये सापडलेल्या नागरिकांना तात्काळ मदत देण्यासाठी हा मित्र परिवार नेहमीच अग्रेसर राहिला आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या वह्या वाटप कार्यक्रमाला विशाल मनोहर सावंत, एस.पी. इन्फ्रा ग्रुपचे शैलेश गायकवाड, श्रिया फाउंडेशनचे संदीप म्हात्रे, गोविंद शेळके, दुंदरेचे माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक उलवेकर, नरेश मढवी, देविदास चौधरी, धिरज कदम, सागर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून आणि स्थानिक नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.