
पनवेल, दि. 10 (वार्ताहर) : जमिनीच्या अफरातफरी प्रकरणातील सराईत आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी दुधनाका, कल्याण (जि. ठाणे) येथे सापळा रचून अटक केली.
पनवेल तालुक्यातील मौजे पाले बुद्रुक येथील गट सर्व्हे नं.98/3 क्षेत्र 3.75 हेक्टर ही जागा तक्रारदार यांच्या वडिलांच्या मृत्यूपश्चात तक्रारदार आणि त्यांचा भाऊ असे त्यांच्या मालकीचे व ताबेकब्जात असताना सराईत आरोपी मन्सुर उमर अंतुले (55 रा.कल्याण) याने या दोघांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने सदर जागेचे बनावट नोटरी कुलमुखत्यारपत्र व बनावट नोटरी खरेदीखत तयार करून त्यावर तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांच्या बनावट सह्या करून बनावट अंगठ्याचे ठसे लावून सदर जागेत अनधिकृतरित्या अतिक्रमण करून स्वतःच्या नावाचे बोर्ड लावून बांधकामाचे साहित्य टाकून तेथे बांधकाम सुरू केल्याची माहिती तक्रारदार यांना मिळाली.
ही माहिती मिळताच त्यांनी या संदर्भात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस हवालदार शिवाजी बाबर, पोलीस हवालदार वैभव पाटील, पोलीस शिपाई आकाश भगत तसेच महिला पोलीस शिपाई स्नेहल लावंड अधिक तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. त्यानुसार मन्सूर उमर अंतुले याच्याविरुद्ध पुरावे निष्पन्न झाल्यानंतर दुधनाका, कल्याण येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. या गुन्हेगाराने त्याने वापरलेला मोबाईल फोन हस्तगत केलेला आहे. विशेष म्हणजे, सदर आरोपीविरुद्ध ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत फसवणूक व बनावटीकरणाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
अशा प्रकारे जमिनी फसवणुकीचे गुन्हे सदर आरोपीने रायगड जिल्ह्यासह ठाणे जिल्ह्यात केले आहेत. याबाबत कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा
ः वपोनि गजानन घाडगे


Be First to Comment