Press "Enter" to skip to content

हेल्प फाउंडेशनने राबवलेल्या थरारक मोहिमेत युवकाची सुटका

“एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला

खोपोली : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. डोंगरदऱ्या धुक्याने व्यापल्या आहेत, नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि धबधबे रौद्ररूप धारण करत आहेत. प्रशासन, हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सातत्याने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन करत आहेत. मात्र सोशल मीडियासाठी फोटो, व्हिडिओ आणि थरार अनुभवण्याच्या हव्यासापोटी काही हौशी पर्यटक अजूनही जीवाशी खेळ करत असल्याचे चित्र आहे.

अशाच एका बेफिकीर निर्णयामुळे खोपोलीतील प्रसिद्ध केपी वॉटर फॉल परिसरात बुधवारी संध्याकाळी थरारक बचाव मोहीम राबवावी लागली. मोहम्मद जुहेर शेख या 18 वर्षीय युवकाच्या हट्टामुळे पोलीस, आपत्कालीन यंत्रणा आणि हेल्प फौंडेशनच्या सदस्यांना मुसळधार पावसात स्वतःचा जीव धोक्यात घालून डोंगरमाथ्यावर चढावे लागले.

मुंबईतील कुर्ला येथे राहणारा हा युवक 8 जुलै रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता घरच्यांना कोणतीही माहिती न देता एकटाच लोकल रेल्वेने खोपोलीत दाखल झाला. मोबाईलवर मिळालेल्या लोकेशनच्या आधारे तो प्रथम झेनिथ वॉटर फॉल परिसरात पोहोचला. धबधब्याचे रौद्र सौंदर्य पाहून तो भारावून गेला. मात्र तेवढ्यावर समाधान न मानता त्याने आणखी धोकादायक असलेल्या केपी वॉटर फॉलच्या उगमाकडे जाण्याचा निर्णय घेतला.

समोर होती निसरडी चढण, उभा कातळ, दाट झाडी आणि डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या पाण्याचा प्रचंड प्रवाह त्यात पावसाची सोबत. सामान्य माणूस अशा परिस्थितीत मागे फिरला असता, पण तरुण रक्ताच्या जोशाने त्याला पुढे ढकलले. तब्बल तीन तास संघर्ष करत तो धबधब्याजवळ पोहोचला. तेथे त्याने सेल्फी काढली, छायाचित्रण केले, सोबत आणलेले खाद्यपदार्थ संपवले आणि समाधानाने परतीचा मार्ग धरला.

परंतु निसर्गासमोर मानवी गर्व किती क्षुल्लक असतो याची जाणीव त्याला काही क्षणांतच झाली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास परतताना त्याचा पाय घसरला आणि तो जोरात कातळावर आदळला. डाव्या हाताला जखम झाली, अंगाला जबर मुका मार बसला आणि चालणे अवघड झाले. काही क्षणांपूर्वी धाडसाचे प्रतीक वाटणारा डोंगर आता त्याला मृत्यूच्या दरीसारखा भासू लागला.

आजूबाजूला कोणी नव्हते. पावसाचा आवाज एवढा प्रचंड होता की मदतीसाठी आरडाओरडा करूनही उपयोग नव्हता.
घरच्यांना काही न सांगता आल्याची खंत आणि जीव वाचेल की नाही, याची भीती त्याला सतावू लागली. त्याच वेळी त्याने मोबाईलवर मदतीचा मार्ग शोधला आणि 112 या आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधला.

त्याच्या हेल्पलाइन वरील एका फोन कॉलने संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, पोलीस हवालदार धनाजी रूपनवर आणि बीट मार्शल यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेत हेल्प फाउंडेशनशी संपर्क साधला.

सायंकाळी पाचच्या सुमारास हेल्प फाउंडेशनचे प्रशिक्षित बचाव पथक आवश्यक उपकरणे, दोरखंड आणि सुरक्षा साहित्य घेऊन त्या युवकाच्या दिशेने रवाना झाले. मात्र पुढील काही तास हे त्या युवकासाठी आणि बचाव पथकासाठी परीक्षा घेणारे ठरले. भरधाव वेगाने कोसळणारे धबधबे, कमरेपर्यंत वाहणारे पाण्याचे प्रवाह, चिखलाने निसरडे झालेले कातळ आणि सतत खंडित होणारे मोबाईल नेटवर्क यामुळे युवकाचे अचूक लोकेशन शोधणे कठीण बनले होते. प्रत्येक मिनिटागणिक अंधार वाढत होता आणि बचाव मोहिमेची जोखीमही वाढत होती. दुसरीकडे, जखमी युवकाचा धीर सुटत चालला होता. प्रत्येक फोन कॉलमध्ये त्याच्या आवाजातील भीती वाढलेली जाणवत होती. “मला वाचवा… लवकर या…” अशी त्याची विनवणी ऐकून बचाव पथक आणखी वेगाने पुढे सरकत होते.

अखेर अनेक अडथळे पार करत हेल्प फाउंडेशनचे सदस्य त्याने सांगितलेल्या खुणांपर्यंत पोहोचले. दूरवरून दिसलेले ते चेहरे त्या युवकासाठी देवदूतांपेक्षा कमी नव्हते. समोर मदत पोहोचल्याचे पाहताच त्याच्या डोळ्यांत दिलास्याचे अश्रू तरळले. टीमने त्याला प्रथम पाणी आणि खाद्यपदार्थ दिले. जखमेची पाहणी केली आणि प्रथमोपचार करत मानसिक आधार दिला. त्यानंतर सुरू झाला परतीचा सर्वात धोकादायक टप्पा. प्रत्येक पाऊल जपून टाकत, नीसरड्या वाटांवर एकमेकांना आधार देत आणि धबधब्यांच्या पाण्याशी झुंज देत बचाव पथकाने युवकाला सुरक्षित खाली आणले. तोवर संपूर्ण परिसरात अंधार पसरू लागला असतानाच ही मोहीम यशस्वी ठरली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये त्या युवकाला आणल्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी त्याची समजूत काढली. त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि भविष्यात अशा प्रकारचे जीवघेणे धाडस टाळण्याचा सल्ला दिला.

“जर मोबाईल हरवला असता, संपर्क तुटला असता किंवा युवक आणखी खोल दरीत कोसळला असता, तर त्याचा शोध घेणे अत्यंत अवघड झाले असते. अशा निष्काळजीपणाची किंमत कधी कधी जीव गमावून मोजावी लागते,” असेही त्यांनी सांगितले. आवश्यक त्या प्रशासकीय आणि कायदेशीर पूर्तता पूर्ण करून युवकाला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या धाडसी मोहिमेत हेल्प फाउंडेशनचे सौरभ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली महेश भोसले, अमोल कदम, निलेश कुदळे, गौरव शिंदे, भक्ती साठेलकर, रघुवीर खरे, संकेत पाटील, साहिल घरत आणि अथर्व रासम यांनी सहभाग घेतला.

आवाहन :

धबधब्यांचे सौंदर्य, डोंगरांचे आकर्षण आणि सोशल मीडियाची भुरळ यापेक्षा मानवी जीव अमूल्य आहे. अतिवृष्टीच्या काळात पर्यटनासाठी जाण्यापूर्वी स्वतःच्या सुरक्षिततेचा आणि आपल्या कुटुंबाच्या भावनांचा विचार करा.

कारण तुमचा एक बेफिकीर निर्णय केवळ तुमचाच जीव धोक्यात घालत नाही, तर तुम्हाला वाचवण्यासाठी धावून येणाऱ्या अनेक बचावकर्त्यांचाही जीव संकटात टाकतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.