
दोघांचा मृत्यू तर 8 जण जखमी; शिवसेना उबाठा पक्ष धावला मदतीला
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः पनवेलजवळील तळोजा सेक्टर 10 फेज 1 मध्ये आज कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बेफाम कारने तब्बल 8 ते 10 जणांना जोरदार धडक दिली. या भीषण दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी मदतीला धावले.
तळोजातील फेज-1 येथे अपघाताच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील, कैलास पाटील व इतर पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान, अपघाताची तीव्रता पाहून एमएच 46 डीए 4814 या क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारचा चालक आपली गाडी घटनास्थळीच सोडून फरार झाला आहे.
या अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या काहींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. अपघातग्रस्त कार (क्रमांक: एमएच 46 डीए 4814) ताब्यात घेण्यात आली असून, फरार कारचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रे फिरवली आहेत. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.





Be First to Comment