Press "Enter" to skip to content

विचुंबेतील सुमित पवारचा दुर्दैवी अंत तर नयन म्हात्रे अद्याप बेपत्ता

पनवेल-धोधाणीत दुर्दैवी घटना ! वाघाची वाडी नदीत पोहताना २ तरुण गेले वाहून

पनवेल : संजय कदम

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान पनवेल तालुक्यातील धोधाणी परिसरात रविवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. वाघाची वाडी येथील नदीपात्रात पोहत असताना २ तरुण पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले. नयन म्हात्रे आणि सुमित पवार अशी या २ तरुणांची नावे असून सुमारे १० जणांचा ग्रुप या नदी परिसरात मौजमजा करण्यासाठी गेले होते. बुडालेले दोघेही तरुण विचुंबे गावातील रहिवासी होते. मुसळधार पावसामुळे वाघाची वाडी परिसरातील नदी दुथडी भरून वाहत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी इतर मित्रांनी अथक प्रयत्न करत सुमित यशवंत पवार याला पाण्याबाहेर काढले. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, नयन म्हात्रे हा तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि नदीपात्रातील वाढलेला पाण्याचा प्रवाह यामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. धोधानीचे पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून पुढील कार्यवाही पोलीस आणि बचाव पथकांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे विचुंबे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, पावसाळ्यात नद्या, ओढे आणि धबधब्यांमधील पाण्याचा प्रवाह क्षणार्धात वाढू शकतो. त्यामुळे नागरिक व पर्यटकांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सातत्याने करून देखील तरुण जीव गमावत असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.