Press "Enter" to skip to content

पाताळगंगा पुरात 20 जणांची धाडसी सुटका

पुराच्या पाण्यात मिनी बस, लक्झरी बस व इको या तीन गाड्या अडकल्या ; वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

पनवेल, दि. 5 (वार्ताहर) : दिनांक 4 व 5 जुलै 2026 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. खारपाडाआपटा तसेच आपटा फाटारसायनी मार्गावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. पुराच्या पाण्यात मिनी बस, लक्झरी बस व इको अशा तीन गाड्या अडकल्या होत्या.

रोहा येथून रसायनीकडे जाणाऱ्या मिनी बसमध्ये चालकासह 16 प्रौढ स्त्री-पुरुष व 3 लहान मुले असे एकूण 20 जण अडकले होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार तसेच नवीन पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार संजय गावडे, जितू कदम, आदिनाथ आघाव, राकेश बर्डे, दत्ता उबाळे, जयेश पाटील व बाबा काचकुंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस अंमलदार जयेश पाटील व राकेश बर्डे यांनी ग्रामस्थ सूर्यकांत घरत यांच्या मदतीने पुराच्या पाण्यात अडकलेल्या मिनी बसपर्यंत पोहोचून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत सुरक्षितस्थळी हलविले. त्यानंतर एनडीआरएफ पेन व रिलायन्स रेस्क्यू टीमच्या मदतीने अडकलेली बस बाजूला काढण्यात आली तसेच बोटीच्या सहाय्याने परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.

पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूंनी रस्ता बंद करून प्रवासी व वाहनांना पर्यायी मार्गाने रवाना केले. सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसात नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी गोवा रोड, जुना पुणे रोड आणि रसायनी रोडवर अहोरात्र मेहनत घेत वाहतूक कोंडी होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली.
या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसून, स्वतःचा जीव धोक्यात घालून 20 जणांचे प्राण वाचविणाऱ्या तसेच वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या नवीन पनवेल वाहतूक पोलिसांच्या धाडसी आणि तत्पर कार्याचे जनतेतून सर्वत्र कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.