Press "Enter" to skip to content

वरसेचा गळा घोटणाऱ्यांना अभय कोणाचे ?

२०१९ चा सरकारी अहवाल धूळ खात पडला, आज नागरिक पुराच्या विळख्यात !

रोहा : समीर बामुगडे

रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील वाढत्या पूरस्थितीबाबत पंचायत समिती रोहाने ६ जुलै २०१९ रोजी केलेल्या अधिकृत स्थळ पाहणी अहवालाने अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या होत्या. मात्र तब्बल सात वर्षांनंतरही त्या अहवालातील शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. परिणामी आज नागरिकांना पावसाच्या पाण्याचा फटका सहन करावा लागत आहे.

अहवालानुसार सनसिटी रिव्हेस इमारतीसमोरील नाला अरुंद असून त्याचे रुंदीकरण अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. रामचंद्र रेसिडेन्सी ते वर्धमान बिल्डिंग शेजारील नाल्यात नियमित पाणी साचत असल्याने रामचंद्र रेसिडेन्सी ते ब्रेडा कॉम्प्लेक्स दरम्यान मोठा नाला काढण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती.

रामचंद्र रेसिडेन्सीसमोरील नाल्याची रुंदी १६ फूट असली तरी वरच्या बाजूस असलेल्या आकांक्षा मॅन्शनसमोरील नाला अत्यंत अरुंद असल्याने त्याचे रुंदीकरण आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. काशिनाथ धाटावकर परिसरातील स्लॅब ड्रेनचे रुंदीकरण करणेही गरजेचे असल्याचे अहवालात नमूद होते.

वर्धमान बिल्डिंगकडे जाणाऱ्या मोकळ्या जागेतून सुमारे ३० फूट गटार काढण्याची शिफारस करण्यात आली होती. तसेच श्री अपार्टमेंट ते मुख्य नाला धक्का परिसरापर्यंत नवीन गटार बांधण्याची गरजही व्यक्त करण्यात आली होती.

विठाई बिल्डिंग ते जुना नैसर्गिक नाला या भागात नवीन नाला काढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. चव्हाण, दिवकर आणि माळी यांच्या घरापर्यंत नाला बांधणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले होते.

अहवालातील सर्वात गंभीर निरीक्षणांपैकी एक म्हणजे सिगवन व उशिलकर बिल्डर परिसर ते रामचंद्र रेसिडेन्सीच्या पाठीमागील नैसर्गिक नाला बंद असल्याचे. हा नैसर्गिक जलमार्ग पुन्हा सुरू करून त्या मार्गाने पाण्याचा निचरा करण्याची स्पष्ट शिफारस करण्यात आली होती.

चड्डीलाल ते रामचंद्र रेसिडेन्सी दरम्यान अंडरग्राऊंड गटार बांधण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. गोखले यांच्या नवीन इमारतीजवळील मोरीजवळ ३० फूट पक्के गटार बांधण्याची आवश्यकता देखील नमूद करण्यात आली होती.

तळाघर, निवी, वाशी आणि लांडर गावांचे पावसाचे पाणी शिल्पनगरी, काळभैरव मंदिर परिसर आणि भुवनेश्वर मार्गाने वरसे गावातील आदर्शनगर, गणेशनगर व गायत्रीनगरमध्ये येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. हे पाणी भुवनेश्वर गावाच्या बाहेरून स्वतंत्र नाल्याद्वारे वळवण्याची सूचना करण्यात आली होती.

याशिवाय वरसे ग्रामपंचायत हद्दीतील काही ठिकाणी जुन्या नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे स्पष्टपणे नोंदविण्यात आले होते. हे अतिक्रमण हटवून नैसर्गिक नाले मोकळे करण्याची शिफारस करण्यात आली होती.

शिल्पनगरी ते सातमोशी परिसरापर्यंत ३० फूट रुंदीचे गटार बांधण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती. तसेच निवी गणपती विसर्जन घाट आणि BMC कंपनीच्या पाठीमागील नाल्याचे रुंदीकरण करणे अत्यावश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले होते.

प्रश्न असा आहे की, पंचायत समितीच्या अधिकृत अहवालात हे सर्व मुद्दे स्पष्टपणे नमूद असताना गेल्या सात वर्षांत किती कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली? नैसर्गिक नाले मोकळे झाले का? अतिक्रमणांवर कारवाई झाली का? जलनिस्सारणाची व्यवस्था सुधारली का? की सरकारी अहवाल केवळ कागदांपुरतेच मर्यादित राहिले?

२०१९ मध्येच धोक्याची घंटा वाजली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज वरसे परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आता तरी प्रशासनाने जागे होऊन अहवालातील सर्व शिफारशींची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.