
पनवेल | प्रतिनिधी
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डेरवली ते पळस्पे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांना वाहतुकीदरम्यान मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजवून जनतेसमोर सेवाभावी कार्याचा आदर्श ठेवला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भालचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार साबळे आणि पोलीस अंमलदार भोळे यांनी वाहतूक नियंत्रणाच्या जबाबदारीसोबतच रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. मुसळधार पाऊस, चिखल आणि प्रतिकूल वातावरणाची पर्वा न करता त्यांनी हे काम पूर्ण केले.
या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने वाहने प्रवास करीत असतात. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली होती. मात्र पोलिसांच्या या तत्परतेमुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतूक अधिक सुरक्षित झाली आहे.
“जनतेची सेवा हीच खरी कर्तव्यपूर्ती” या भावनेतून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे. जनहितासाठी सदैव तत्पर असलेल्या पनवेल शहर वाहतूक शाखेच्या या कार्यामुळे पोलिसांविषयीचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार साबळे आणि पोलीस अंमलदार भोळे यांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी व कर्तव्यनिष्ठा ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.



Be First to Comment