
पनवेलच्या वीज प्रश्नासंदर्भात लक्ष देणार – मंत्री मेघना बोर्डीकर यांचे आश्वासन
पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येसंदर्भात स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने मुंबईत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या दालनात मंगळवारी (दि.९) महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी विजेच्या समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आमदारांनी केली. त्यावर मंत्री बोर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, पनवेलचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक विकास घरत, प्रवीण पाटील, अजय बहिरा, सुमित झुंजारराव, दशरथ म्हात्रे, अरुणकुमार भगत, अमर पाटील, दिनेश खानावकर, माजी जि.प. सदस्य अमित जाधव, रविनाथ पाटील, सुनील पाटील, विश्वजित पाटील, मुकेश फडके आदींसह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वीज समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, पनवेल तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये मागील काही काळापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. महावितरणकडून उपलब्ध झालेल्या एप्रिल व मे २०२६ या कालावधीतील ट्रिपिंग अहवालाच्या अभ्यासातून पनवेल विभागातील वीज वितरण व्यवस्थेची चिंताजनक स्थिती समोर आली आहे. विशेषतः भिंगारी स्विचिंग स्टेशन, नवीन पनवेल सेक्टर ७, १५, पनवेल कल्पतरू रिव्हरसाईड, टपाल नाका जीआयएस, आकुर्ली, करंजाडे, वडघर आणि परिसरातील अनेक फीडर्सवर ट्रिपिंगची संख्या व कालावधी लक्षणीय प्रमाणात दिसून येतो. काही फीडर्सवर १३ ते २४ तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिल्याचे अहवालातून स्पष्ट होते. यामुळे नागरिक, व्यापारी, लघुउद्योग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, गृहनिर्माण संस्था व सर्वसामान्य ग्राहक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
पनवेल तालुका हा राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या भागापैकी एक आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक व व्यावसायिक वाढ, मोठ्या प्रमाणातील गृहनिर्माण प्रकल्प, वाढती लोकसंख्या आणि नागरी विस्तार यामुळे विजेची मागणी सातत्याने वाढत आहे, मात्र सध्याची वितरण यंत्रणा या वाढत्या मागणीच्या तुलनेत अपुरी पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ही समस्या केवळ तात्पुरत्या दुरुस्तीपुरती मर्यादित न ठेवता दीर्घकालीन आणि नियोजनबद्ध पद्धतीने सोडविणे अत्यावश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर आपण या विषयात वैयक्तिक लक्ष घालून महावितरणच्या वरिष्ठ अधिकऱ्यांना ठोस, कालबद्ध आणि निधीसह कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश द्यावेत तसेच पनवेल विभागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मान्यता तातडीने देण्यात यावी, अशी मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. यावर मंत्री मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यासंबंधी कार्यवाहीचे निर्देश दिले.


Be First to Comment