
पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणीची मासिक बैठक भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पनवेल येथे उत्साहात पार पडली. आगामी संघटनात्मक कार्यक्रम, जनसंपर्क अभियान तसेच विविध उपक्रमांच्या नियोजनाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
यावेळी व्यासपीठावर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस तथा महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महापालिका सभागृहनेते व जिल्हा सरचिटणीस ॲड. प्रकाश बिनेदार, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सिताराम चौधरी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सागर सांगडे, खोपोली उपनगराध्यक्ष विक्रम साबळे आदी उपस्थित होते. बैठकीला जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, विविध सेल व मोर्चांचे अध्यक्ष, मंडल अध्यक्ष उपस्थित होते.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारच्या १२ वर्षपूर्ती निमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती व जनसंपर्क कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. केंद्र सरकारने गेल्या १२ वर्षांत देशाच्या विकासासाठी, पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी, गरीब कल्याणासाठी, महिला सक्षमीकरणासाठी तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच वृक्षारोपण अभियान, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम प्रत्येक मंडल स्तरावर प्रभावी नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश देण्यात आले.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करताना केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करावे, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रमांची रूपरेषा मांडत सर्व पदाधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयातून पक्षाची ताकद अधिक वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध कामकाज, कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आणि जनतेशी सातत्यपूर्ण संपर्क यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीचा समारोप आगामी कार्यक्रम यशस्वी करण्याच्या निर्धारासह करण्यात आला.



Be First to Comment