Press "Enter" to skip to content

पनवेल तहसीलदारांना दिले निवेदन

भाताण गावातील १५ एकर आकारीपड जमीन ‘अमिटी’ला देण्यास मनसेचा तीव्र विरोध

पनवेल ( वैभव लबडे) : तालुक्यातील भाताण येथील १५ एकर ‘आकारीपड’ जमीन ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता, बेकायदेशीररीत्या अमिटी विद्यापीठाला हस्तांतरित केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पनवेल तालुक्याच्या वतीने प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने आज पनवेलचे तहसीलदार, प्रांत अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) आणि भूमी अभिलेख अधिकारी यांना जाहीर निवेदन सादर केले.

प्रशासनाला दिलेल्या या निवेदनात मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून, या गंभीर विषयावर येत्या १५ दिवसांत प्रशासनाने लेखी स्पष्टीकरण किंवा समाधानकारक उत्तर न दिल्यास, हा लढा अधिक तीव्र करून वरिष्ठ पातळीवर नेण्याचा इशारा दिला आहे. तसेच न्याय मिळेपर्यंत मनसेच्या वतीने सातत्याने आंदोलने केली जातील, असेही प्रशासनाला खडसावून सांगण्यात आले.

यावेळी सुजित सोनावने ( मनसे पनवेल तालुका अध्यक्ष), साईराज माळी ( मनसे पनवेल उपतालुकाध्यक्ष), विजय ठाकूर ( मनसे शाखा अध्यक्ष भाताण ) साईनाथ पाटील ( मनसे कार्याध्यक्ष भाताण), निलेश जुमारे ( मनसे शाखा उपाध्यक्ष भाताण ) सत्यजित जितेकर ( दापोली महाराष्ट्र सैनिक ), नितेश भोईर ( मनसे वावेघर विभाग अध्यक्ष), संतोष गायकवाड ( मनसे विचुंबे उपविभाग अध्यक्ष) आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या संदर्भात मनसे नेत्यांनी सांगितले की, “पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी देखील या प्रकरणात सकारात्मक प्रतिसाद दिला असून स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे. हा लढा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून संपूर्ण गावकीचा आणि भाताण गावाच्या येणाऱ्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा आहे.” या आंदोलनात आणि कायदेशीर लढ्यात भाताण गावातील सर्व ग्रामस्थांनी पक्षाचे भेद विसरून एकत्र यावे आणि सहकार्य करावे, असे आवाहनही मनसे पनवेल तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.