Press "Enter" to skip to content

सिडको प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात निलेश पाटलांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र


पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः महाराष्ट्र राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सिडको’ प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार फोफावला असून, प्रकल्पग्रस्तांची कामे पैसे दिल्याशिवाय होत नसल्याचा गंभीर आरोप पनवेलचे माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून सिडकोतील भ्रष्टाचाराला आळा घालण्याची विनंती केली आहे.

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सिडको क्षेत्रातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे पनवेल आणि उरणचे आमदार यांनी सिडको अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. सत्ताधारी आमदारांनीच प्रशासनाविरोधात आवाज उठवल्यामुळे हा विषय जोरदार चर्चेत आला आहे. सिडकोमध्ये साडेबावीस टक्के विभागात काम करणाऱ्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाले होते. मागील 6 महिन्यांत एसीबीच्या कारवाईत 5 सिडको कर्मचारी रंगेहाथ पकडले गेले आहेत, तरीही येथील भ्रष्टाचाराला लगाम लागलेला नाही.

निलेश पाटील यांनी पत्रातून तीव्र संताप व्यक्त करताना म्हटले आहे की, लाच घेताना रंगेहाथ पकडलेले अधिकारी पुन्हा सेवेत रुजू होतात आणि सिडकोसारख्या मलाईदार समजल्या जाणाऱ्या विभागात पुन्हा खुर्ची मिळवतात. अशा लाचखोर अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता, प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यात यावा. नावडे परिसरातील शेतकऱ्यांनी नुकतेच सिडको भवनमध्ये येऊन आंदोलन केले होते. साडेबारा टक्के भूखंड वाटप सोडत होऊन दोन महिने उलटून गेले, तरी इरादापत्र दिले जात नाही. शेतकऱ्यांकडून विशिष्ट टक्केवारी (कमिशन) घेतल्याशिवाय कोणतीही कामे केली जात नाहीत, असा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या पत्राची प्रत माहितीसाठी पीएमओ कार्यालय (), मुख्यमंत्री कार्यालय, नगरविकास सचिव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक () तसेच स्थानिक खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि आमदार विक्रांत पाटील यांनाही पाठवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री यावर काय पाऊल उचलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.