Press "Enter" to skip to content

“प्लास्टिकला नकार, पर्यावरणाला आधार”

खोपोलीत कापडी पिशव्यांच्या वापरासाठी जनजागृती उपक्रम

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत खोपोली शहरात प्लास्टिकमुक्त वातावरण निर्मितीसाठी एक सकारात्मक आणि दूरदृष्टीचा उपक्रम राबविण्यात आला. वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरण, प्राणीजीवन तसेच मानवी आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी खोपोली नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ प्रतीकात्मक न राहता नागरिकांना पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मार्केट परिसरात वेंडिंग मशीनच्या माध्यमातून माफक दरात कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा अभिनव निर्णयही घेण्यात आला आहे.

आज प्लास्टिक पिशव्यांचा बेफाम वापर ही पर्यावरणासमोरील गंभीर समस्या बनली आहे. प्लास्टिक सहज नष्ट होत नसल्याने गटारे तुंबणे, जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होणे, माती व जलप्रदूषण वाढणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सवयींमध्ये छोटासा बदल करत कापडी पिशव्यांचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या उपक्रमात प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांचे विशेष स्वागत करून त्यांचे कौतुकही करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी सामान्य नागरिकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित करत नागरिकांमध्ये सकारात्मक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करत प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यास प्राधान्य देण्याची सकारात्मक भूमिका दर्शवली.

यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेवक संदीप पाटील, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील, इनरव्हील क्लब ऑफ खोपोलीची संपूर्ण कार्यकारिणी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत साठे, गुरुनाथ साठेलकर तसेच स्वच्छता निरीक्षक गौतम मोरे, शिवा चिन्नास्वामी, शहर समन्वयक भक्ती साठेलकर आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.

“आज एक कापडी पिशवी स्वीकारली, तर उद्या पर्यावरणासाठी मोठे योगदान दिले”, हा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची नवी जाणीव निर्माण करणारा ठरला आहे. या उपक्रमात प्रशांत साठे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.