Press "Enter" to skip to content

सय्यद अकबर यांची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा कोकण सहसंयोजक पदी नियुक्ती

सक्षम व्यक्तिमत्त्वाची योग्य पदावर निवड झाल्याची कार्यकर्त्यांच्यात भावना

पनवेल /प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या माध्यमातून जनसंपर्क,जनसेवा आणि जनउद्धाराचे दणकेबाज कार्य करणाऱ्या सय्यद अकबर यांच्या सक्षम खांद्यावर पक्ष नेतृत्वाने कोकण प्रांत सहसंयोजक म्हणून जबाबदारी दिली आहे. येत्या ५ जून ते ३० जून दरम्यान होणाऱ्या विविध मंडळ स्तरीय कार्यक्रमांची काटेकोर नियोजन यंत्रणा उभारणे आणि त्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्याच्या अनुषंगाने सय्यद अकबर यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पक्ष संघटन, निवडणुका नियोजन आणि योजना अमंलबजावणी यांचा प्रचंड दांडगा अनुभव असणाऱ्या सय्यद अकबर यांची कोकण प्रांत सहसंयोजक पदी नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांच्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी सुमारे महिन्याभराच्या कालावधीमध्ये जनसंपर्क, स्वास्थ्य संवर्धन आणि पर्यावरण रक्षण या तीन महत्त्वपूर्ण आघाड्यांवर जनता केंद्रित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांची आखणी, छोट्यातल्या छोट्या गोष्टीचे नियोजन आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी सुरळीत आयोजन करणे याकामी मंडळ स्तरावर सक्षम शिलेदार निवडण्याची जबाबदारी देखील सय्यद अकबर यांच्यावर पक्ष नेतृत्वाने सोपविलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये वृक्षारोपण अभियान, तसेच “एक पेड माँ के नाम” अभियान, देशाला अत्यंत गरज असणारी अशी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी सायकल आणि दुचाकी रॅली, स्वच्छता तसेच प्लास्टिक मुक्त अभियान, जलसंरक्षण जागरूकता अभियान, वृक्ष वाटप, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लोकाभिमुख कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी आणि युवा वर्गाला सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीने गांजलेल्या भारत देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व लाभले आणि भारत देश प्रगतीच्या लाटेवर आरूढ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोनेरी अशा या ऐतिहासिक कारकीर्दीला १२ वर्षे पूर्ण होत आहेत. या एक तपाच्या राजवटीमध्ये भारतीय एक नवीन भारत अनुभवत आहेत. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षात केलेल्या जनता केंद्रित कार्याला प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे अभियान यशस्वीरित्या राबविण्याची जबाबदारी सय्यद अकबर यांना प्रदान करण्यात आली आहे. कोकण प्रांतात समाविष्ट असणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्यांक समाजाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ने राबविलेल्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम यामध्ये करायचे आहे. तसेच बुथ स्तरावर संघटनात्मक कार्यक्रम अधिक सक्षमपणे राबविणे, जनसंवाद तसेच समाज माध्यमांवर पंतप्रधानांनी केलेल्या सकारात्मक कार्याची छाप पाडणे आणि अल्पसंख्यांक बांधवांसाठी असणाऱ्या योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थी निर्माण करून त्यांना संघटनेमध्ये सहभागी करून घेणे असे महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन देखील करण्यात आले आहे. अल्पसंख्यांक मोर्चामध्ये सय्यद अकबर यांनी केलेल्या नेत्रदीपक कार्यामुळेच अशा महत्वपूर्ण कामाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २१ जून रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस आता केवळ भारतातच नव्हे तर जगभरात साजरा व्हायला लागला आहे. यंदाचे वर्षी कोकण प्रांतामध्ये योग दिवस आयोजित करून त्याचे अनुषंगाने जनसंपर्क वाढवण्याचे कार्य सय्यद अकबर यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैश्विक पातळीवर नेऊन ठेवलेले योग दिवस आणि त्या अनुषंगाने योगाभ्यास यामुळे सुदृढ जीवन शैली प्राप्त होत असल्याच्या संकल्पनेला घराघरात पोहोचवायचे आहे.
या नियुक्ती बाबत विचारले असता सय्यद अकबर म्हणाले की हे पद म्हणजे मी करत असलेल्या निस्सिम कार्याची पावती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला गुरुमंत्र म्हणजे सबका साथ! सबका विकास!. हा गुरुमंत्र मी माझ्या हृदयावर आणि मेंदू मध्ये कोरला आहे. रायगड – कोकण चे भाग्यविधाते लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली मी नेहमीच कार्यरत असतो तसाच यापुढे देखील असेन. आगामी काळातील जनता केंद्रित कार्यक्रम मी समाजातील अखेरच्या घटकापर्यंत घेऊन जाईन असा मला ठाम विश्वास आहे. या कामात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मला अत्यंत मोलाची साथ मिळेल यात जराही दुमत नाही. माझ्या कार्याची दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने जी जबाबदारी दिली आहे त्याबद्दल त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.